विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव उपसरपंचपदासाठी नाट्यमयरित्या सारिका नितीन मोहारे यांची निवड झाली. पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम लगड यांच्या गटाकडून फुटून त्यांनी नागवडे कारखान्याचे संचालक हेमंत नलगे यांच्या गटाकडून उपसरपंचपद मिळविले आहे. यावेळी प्रथमच लोकनियुक्त सरपंचाच्या निर्णायक मताचा वापर करण्यात आला.
कोळगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदी नलगे गटाच्या वर्षा काळे निवडून आल्या होत्या; मात्र बहुमत लगड गटाला मिळाले होते. सतरापैकी लगड यांचे दहा तर नलगे गटाचे सात सदस्य निवडून आले होते. त्यामुळे यापूर्वी लगड गटाचे शरद लगड, नितीन नलगे व अमित लगड यांनी प्रत्येकी सव्वा वर्षे उपसरपंचपद सांभाळले. गेल्या महिन्यात ठरल्याप्रमाणे अमित लगड यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे बुधवारी या पदासाठी सरपंच वर्षा काळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. लगड गटाचे सदस्य बाळासाहेब उजागरे यांचे निधन झाल्याने त्यांची सदस्य संख्या नऊवर आली. लगड गटाकडून संधी मिळत नसल्याने सारिका नितीन मोहारे यांनी नलगे गटाच्या वतीने उपसरपंचपदासाठी अर्ज केला. त्यांच्या विरोधात लगड गटाकडून इंदुबाई रामचंद्र भापकर यांनी अर्ज दाखल केला होता.
नलगे गटाच्या कोमल मोरे यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी यांनी रद्द ठरविल्याने नलगे गटाची सदस्य संख्या मोहारे यांच्यासह सात झाली. एक सदस्य मयत झाल्याने व मोहारे फुटून विरोधी गटात गेल्या तरीही लगड यांची सदस्य संख्या आठ होती. असे असताना एक मत बाद झाल्याने मोहारे व भापकर यांना समसमान मते मिळाली. अशावेळी नलगे गटाला लोकनियुक्त सरपंच वर्षा काळे यांच्या निर्णायक मताचा लाभ होऊन सारिका नितीन मोहारे या उपसरपंचपदासाठी निवडून आल्या आहेत. या निवडीबद्दल मोहारे यांचे माजी आमदार राहुल जगताप, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, हेमंत नलगे यांनी अभिनंदन केले.
220921\4010fb_img_1632316233834.jpg
सारिका नितीन मोहारे.