शेवगाव : गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शेती पीक वाहून गेले, जनावरे दगावली, घरांची पडझड झाली. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करुन मदतीसाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र हेक्टरी ६ हजार ८०० रुपये अपेक्षित निधी प्रस्तावात दाखविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रत्येकी लाखाेंचे नुकसान अन् मदत हजारात अशी, परिस्थिती निर्माण झाली आहे. तुटपुंजा निधी संदर्भात शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तालुक्यातील विविध गावांत ३० ऑगस्टला रात्री अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यात सोयाबीन, भुईमूग पावसाने मातीमोल केले. तर, शेतातील पशुधन, अवजारांसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यात सर्वाधिक पेरा कपाशीचा असून सोयाबीन, भुईमूग काढणीला आले होते. दरम्यान, तालुका प्रशासनाच्या वतीने तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांच्या मदतीने युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्यात आला. परंतु ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांची आकडेवारी शासनदरबारी पाठविण्यात आली आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर, मूग आदी पिकांना हेक्टरी ६ हजार ८०० रुपये निधी अपेक्षित असल्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत किती मिळेल?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
_________
तालुक्यातील डोंगर आखेगाव, आखेगाव तितर्फा, खरडगाव, वरुर बु, वरुर खु, भगूर, वडुले बु, जोहरापूर आदी गावांसह शेवगाव शहरातील बाधित वस्त्यांचे पंचनामे करुन तहसील कार्यालयामार्फत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावानुसार जिरायती पिकाखालील बाधित क्षेत्र २ हजार १९४ हेक्टर असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक १ हजार ४०२ हेक्टर व्यापारी पीक क्षेत्र असून तृणधान्य ११८, कडधान्य ५३६, तेलबिया ३१, इतर १०५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिरायत पिकासाठी ६ हजार ८०० रुपये प्रती हेक्टर प्रमाणे १ कोटी ४९ लाख २३ हजार रुपयांचा निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
---------
बागायती क्षेत्रासाठी १८ हजारांचा प्रस्ताव
बागायत पिकाखालील ६३७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून भाजीपाला व इतर पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ५०० प्रमाणे ८६ लाख रुपये निधी अपेक्षित आहे. तर, ३५.६८ हेक्टर फळबागांचे नुकसान झाले असून हेक्टरी १८ हजार प्रमाणे ६ लाख ४३ हजार निधी अपेक्षित आहे.
---------------
• पिकांव्यतिरिक्त नुकसान खालील प्रमाणे.
• मनुष्य हानीसाठी ४ लाख.
• मृत पशुधन ७७ लाख ९९ हजार
• कुक्कुटपालन पक्षी ६८ हजार ५००
• घरगुती वस्तू सानुग्रह सहाय्य ४५ लाख ६५ हजार
• पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांच्या पडझडीसाठी ३१ लाख ३८ हजार ३००
• घराचे किमान नुकसान ६ लाख ६० हजार