कर्जत : दोन कोटी रुपये खर्च करून कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प तयार झाला आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. येथे हवेतून ऑक्सिजन संकलन केले जाणार आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कर्जतकरांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासली. अहमदनगर, बारामती, पुणे येथून ऑक्सिजन आणावा लागत होता. तरीही तो वेळेत उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे आरोग्य अधिकारी व रुग्णांच्या नातेवाईकांना कसरत करावी लागत होती. ही समस्या ओळखून आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून कर्जत येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी आणली. यासाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले. हे काम तामिळनाडूमधील कोईम्बतूर येथील फारडओझेन या कंपनीने पीएसए टेक्नॉलॉजी वापरून पूर्ण केले आहे. या कंपनीचे कार्यकारी संचालक विवेकानंदन व राहुल राज यांच्या मार्गदर्शनाखाली ही उभारणी केली. तहसीलदार नानासाहेब आगळेे व उपजिल्हा रुणालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कुंडलिक अवसरे यांनी या प्रकल्पाच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवले.
उपजिल्हा रुग्णालयात ऑपरेशन थिएटर, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया या विभागांसह सत्तर बेडला एकाच वेळी ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. येथील सर्व टेक्निकल कामे पूर्ण झाली आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी इंजिनिअर कार्तिक, देवेंद्रन, शशीधरण यांनी मेहनत घेतली आहे. या प्रकल्पासाठी चोवीस तास वीज उपलब्ध व्हावी यासाठी स्वतंत्र दोनशे केव्हीच्या रोहित्राची उभारणी करण्यात आली आहे.
---
दररोज मिळणार २५० सिलिंडर..
येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामधून दररोज २५० सिलिंडर प्राणवायूची निर्मिती होणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयासह शहरासह तालुक्यातील इतर रुग्णालयात उपचारासाठी लागणारा प्राणवायू येथे उपलब्ध होणार आहे. प्रकल्पालगतच ऑक्सिजन साठविण्याचीही सोय आहे.
---
२९ कर्जत ऑक्सिजन
कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प.