जरा याद करो कुर्बानी...
By Admin | Updated: August 14, 2014 23:14 IST2014-08-14T23:12:54+5:302014-08-14T23:14:33+5:30
योगेश गुंड, अहमदनगर इतिहासातील अनेक परकीय शत्रूंचे हल्ले पचविलेल्या नगर जिल्ह्याने स्वातंत्र्य चळवळीतही महत्त्वाचे योगदान दिले.

जरा याद करो कुर्बानी...
योगेश गुंड, अहमदनगर
इतिहासातील अनेक परकीय शत्रूंचे हल्ले पचविलेल्या नगर जिल्ह्याने स्वातंत्र्य चळवळीतही महत्त्वाचे योगदान दिले. सन १८१८ मध्ये पेशवाईच्या अस्तानंतर सन १८२२ मध्ये इंग्रजांनी नगर जिल्ह्याची निर्मिती केली. मात्र या भूमीत देशसेवा, देशभक्ती आणि राष्ट्रनिष्ठा भिनलेली असल्याने देशासाठी प्राणार्पण करणारे हिरे या भूमीत जन्माला आले. यामुळेच ही भूमी संतांबरोबरच शहिदांची भूमी म्हणूनही ओळखली जाते. स्वातंत्र्योत्तर काळातही देशसेवा अखंड सुरू होती. देशांच्या सीमांचे रक्षण करता-करता नगर जिल्ह्यातील ५३ जणांनी प्राणाची आहुती दिली. वीरचक्र, शौर्यचक्र व सेना पदक मिळवणारी नगर जिल्ह्यातील ही भूमी पवित्र बनली. याच भूमीतील मातीने ‘तिलक’ लावावा अशी ही माती या अनमोल रत्नांची खाण ठरली.
स्वातंत्र्यचळवळीतील छोडो भारत, चले जाव, असहकार, सविनय कायदेभंग अशा आंदोलनांत भाग घेऊन नगर जिल्ह्याने राष्ट्रावरील निष्ठेची साक्ष दिली. स्वातंत्र्यानंतरही देशभक्तीने भारावलेले अनेक तरुण सैन्यदलात दाखल होऊ लागले. त्यात जिल्ह्यातील तरुणही आघाडीवर होते. देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी परकीय शत्रूंच्या कुरघोड्या थांबल्या नव्हत्या. त्यासाठी देशाच्या इंच-इंच भूमीचे रक्षण करण्यासाठी जिवाची पर्वा न करता लढलेल्या सैन्यांमध्ये नगर जिल्ह्यातील सैन्यांनीही मोठे योगदान दिले. १९६२ च्या भारत-चीन युद्धात दत्तात्रय गटणे या जिल्ह्यातील सुपुत्राला वीरमरण आले. तेव्हापासून आजतागायत नगर जिह्यातील ५३ जणांनी भारतमातेला वाहून घेतले.
वीरचक्रांसह ७ पदकांवर नगरचे नाव
युद्धभूमीत शौर्याची बाजी लावणाऱ्या जिल्ह्यातील सात शहिदांना मरणोत्तर पदके देण्यात आली. यात वीरचक्रावर नगरचे नाव कोरलेले बुऱ्हाणनगरचे एकनाथ कर्डिले, शौर्यचक्रावर नाव कोरलेले त्रिंबक दादा निमसे (मांडवे), भानुदास उदर (वाकोडी फाटा) तर सेना पदकांवर नाव कोरलेल्यांमध्ये नानाजी पगारे (कोपरगाव), सचिंद्र साके (श्रीगोंदा), प्रदीप भोसले (राशिन), जगन्नाथ जाधव (नगर) या जिल्ह्यातील शूर जवानांचा समावेश होता. ही सर्व पदके युद्धभूमीत शौर्य गाजवत असताना वीरमरण आल्याने त्यांना बहाल करण्यात आली.
१९६५ च्या युद्धात ३ शहीद
१९६५ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात जिल्ह्यातील तीन सैनिकांना वीरमरण आले. पाक सैनिकांनी व घुसखोरांनी काश्मीरचा गिळलेला घास परत बाहेर काढण्यासाठी शंकर बापू एरंडे, कोंडाजी लक्ष्मण मालुणकर आणि लक्ष्मण कांबळे हे जिल्ह्यातील शूरवीर कामी आले. त्यांच्या अतुलनीय कामगिरीमुळेच घुसखोरांनी ताब्यात घेतलेला काश्मीरचा बहुतांशी भाग भारताला परत मिळवण्यात यश मिळाले.
‘आॅपरेशन रक्षक’ गाजवले नगरने; १९ शहीद
सीमारेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसणाऱ्या पाक अतिरेक्यांचा बंदोबस्त करण्यासाठी भारतीय सैन्य दलात तयार करण्यात आलेल्या ‘आॅपरेशन रक्षक’ मध्ये नगरच्या वीर जवानांनी आपले शौर्य गाजवून भारतीय दुश्मनांना जशास तसे उत्तर दिले. देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या व ‘मारिता मारिता मरे तो झुंजेन’ या बाण्याने लढत असलेल्या जिल्ह्यातील सुखदेव रोकडे, अशोक साके, अण्णासाहेब कवडे, बाबासाहेब वाघमारे, मच्छिंद्र लोंढे, अमोल फटांगरे, विठ्ठल भालसिंग, संजय भाकरे, विलास दिघे, सुरेश जाधव, नारायण शिंदे, सचिंद्र साके, मिनीनाथ गिरमकर, संतोष वामन, पुंजाहरी भालेराव, बबन कुटे, प्रमोद वीर या शूर जवानांनी प्राणाची आहुती दिली.
१९७१ च्या भारत-पाक युद्धात ९ जणांना वीरमरण
बांगलादेशचा ताबा घेण्यासाठी छुप्या पद्धतीने दोन हात करण्याची अतुलनीय कामगिरीही जिल्ह्यातील शूर सुपुत्रांनी केली. यात ९ सैनिक कामी आले. त्यांच्या शौर्याच्या जिवावरच १९७१ चे युद्ध भारताने ‘फत्ते’ केले. जिल्ह्यातील लक्ष्मण कोरके (वांबोरी), काशिनाथ वाघ (नगर), एकनाथ कर्डिले (बुऱ्हाणनगर), गंगाधर कोहोकडे (पारनेर), तात्याबा बारगे (निंबोडी), आसाराम तनपुरे (भातोडी), यादव गणपत कांबळे (श्रीगोंदा), विश्वनाथ कुलकर्णी (नगर), मारूती जावळे (पाथर्डी) यांना युद्धात नेत्रदीपक कामगिरी बजावत असताना वीरमरण आले.
नगरचे जवान आघाडीवर
देशाच्या अखंडतेला, सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा वेळोवेळी प्रयत्न झाला. पण शूर जवानांच्या खांद्याला खांदा लावून नगर जिल्ह्यातील जवानांनी युद्धभूमी गाजवली.
भालचंद्र भालेंची चमकदार कामगिरी
केडगाव येथील भालचंद्र भाले यांनी ‘आॅपरेशन पवन’ मध्ये सहभाग घेतला. पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८८ मध्ये श्रीलंकेमध्ये पाठवलेल्या शांतीसेनेत भालेंचा समावेश होता. त्यावेळी तेथील अतिरेक्यांविरोधात भारतीय सेनेने धडक कारवाई सुरू केली. त्यात अतिरेक्यांचा कर्दनकाळ ठरणारे भालचंद्र भालेंचा सहभाग होता. या कडव्या अतिरेक्यांशी लढत असतानाच त्यांना सप्टेंबर १९८८ मध्ये वीर मरण आले. त्यांच्या सारख्या जिगरबाज जवानांमुळेच भारतीय सेनेने श्रीलंकन अतिरेक्यांचा ‘आॅपरेशन पवन’ मध्ये बिमोड केला.
जगन्नाथ जाधवांचे कारगीलमध्ये शौर्य
पाकिस्तानी सैन्याने व घुसखोरांनी १९९९ मध्ये कारगीलमध्ये घुसून भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारतीय सैन्याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शत्रूंचा सामना केला. कारगीलच्या शिखरावर तिरंगा फडकावून भारताने पाक सैन्यांची दाणादाण उडवली. यावेळी झालेल्या ‘आॅपरेशन मेघदूत’ मध्ये नगरचे जगन्नाथ आढाव कारगीलमध्ये शौर्य गाजवत असताना कामी आले. त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर सेना पदक प्रदान करण्यात आले.
शहीद आणि आॅपरेशन...
आॅपरेशन ब्ल्यू स्टार मध्ये श्रीगोंद्यातील नभाजी काळे, आॅपरेशन मेघदूतमध्ये- सुखदेव ढवळे (श्रीगोंदा), नानाजी पगारे (कोपरगाव), जगन्नाथ जाधव (नगर), अनिल निकाळे (राहाता), प्रदीप भोसले (कर्जत) हे शहीद झाले. आॅपरेशन पवन मध्ये चार्लस गायकवाड (पाथर्डी), भालचंद्र भाले (केडगाव), बाजीराव तरटे (पारनेर) हे शहीद झाले. आॅपरेशन बजरंगमध्ये- त्रिंबक दादा निमसे तर आॅपरेशन पराक्रममध्ये भास्कर बोदाडे (वाकोडी) हे शहीद झाले. आॅपरेशन रिहनोमध्ये गोरखनाथ भालसिंग (वाळकी), बाबासाहेब कावरे (पारनेर), रामचंद्र थोरात (पारनेर), सुनील साबळे (नेवासा), भाऊसाहेब बडाख (श्रीरामपूर), सुरेश नरवडे (नगर) यांचा शहिदांमध्ये समावेश आहे. आॅपरेशन विजयमध्ये भानुदास गायकवाड, अंकुश जवक (पारनेर) यांना वीरमरण आले. आॅपरेशन हिफाजतमध्ये भानुदास उदर (नगर) यांना तर आॅपरेशन ओरछिडमध्ये गोरख नाना दिघे (पारनेर) यांना वीर मरण आले.