सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पाऊस रुसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:24 IST2021-08-28T04:24:42+5:302021-08-28T04:24:42+5:30

भंडारदरा धरणातील साठा चालू महिन्यात ९ हजार ५०० दशलक्ष घनफुटापुढे सरकलेला नाही. निळवंडे ६ हजारांवर स्थिर राहिले आहे. सर्वात ...

It rained on the top of Sahyadri | सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पाऊस रुसला

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पाऊस रुसला

भंडारदरा धरणातील साठा चालू महिन्यात ९ हजार ५०० दशलक्ष घनफुटापुढे सरकलेला नाही. निळवंडे ६ हजारांवर स्थिर राहिले आहे. सर्वात जास्त काळजी मुळा धरणाबाबत व्यक्त केली जात आहे. तेथे केवळ १९ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा झालेला आहे.

भंडारदरा व मुळा या दोन्हीही धरणांमध्ये मागील वर्षीचा पाणीसाठा शिल्लक होता. भंडारदरामध्ये १ जूनपूर्वी ४ हजार ६०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा नव्याने केवळ ५ हजार दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले आहे. याचाच अर्थ चालू वर्षात भंडारदरा केवळ ५० टक्के भरले गेले आहे. मुळाची स्थिती तर यापेक्षाही बिकट आहे. तेथे मागील वर्षीचे साडे आठ टीएमसी पाणी शिल्लक होते. यंदा केवळ १० हजार ७०० पाणी धरणात आले आहे.

भंडारदराची १५ ऑगस्टपूर्वी भरण्याची परंपरा खंडित झाली आहे. दुसरीकडे २०१० पासून मुळा धरण पाच वेळा पूर्ण भरू शकलेले नाही. २०१२, २०१३, २०१४, २०१५ व २०१८ ही ती वर्षे आहेत. चालू वर्षीही धरण भरण्याबाबत काळजीचे वातावरण आहे.

------------

गंगापूर व दारणाही ९० टक्क्यांवरच

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा ही दोन्ही धरणे ९० टक्क्यांवर स्थिर आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील या धरणांचे लाभक्षेत्रही अडचणीत सापडले आहे. गोदावरी काठावरील शेतकरीही धरणाच्या पाणलोटाकडे लक्ष ठेवून आहेत.

----------

समन्यायीची टांगती तलवार

नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांवर समन्यायी पाणी वाटप कायद्याची टांगती तलवार आहे. येथील पाणी प्रश्न हा आता जायकवाडी केंद्रित झालेला आहे. १५ ऑक्टोबरला जायकवाडीचा साठा ६५ टक्के झाला नाही तर नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्याची वेळ येते. त्यामुळे नगर, नाशिक व मराठवाडा असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. जायकवाडीचा उपयुक्त साठा सध्या केवळ ४० टक्क्यांवर आहे.

----------

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर २०१७ पासून ५०० ते ७०० मिलिमीटर कमी पाऊस पडलेला आहे. मागील वर्षी भंडारदराच्या पाणलोटावर १५ ऑगस्टनंतर प्रचंड पाऊस कोसळला होता. यंदा मात्र तसे चित्र नाही.

- हरिश चकोर, निवृत्त अभियंता व जलतज्ज्ञ, संगमनेर.

-----------

Web Title: It rained on the top of Sahyadri