घोड धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:20 IST2021-09-25T04:20:51+5:302021-09-25T04:20:51+5:30

श्रीगोंदा : घोड धरणात ३ हजार १४९ एमसीएफटी म्हणजेच ६५ टक्के पाणीसाठा झाला असून दोन दिवसांत सात टक्क्यांनी वाढ ...

Increase in water for Ghod Dam | घोड धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

घोड धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

श्रीगोंदा : घोड धरणात ३ हजार १४९ एमसीएफटी म्हणजेच ६५ टक्के पाणीसाठा झाला असून दोन दिवसांत सात टक्क्यांनी वाढ झाली. मात्र विसापूर तलावाचा पाणीसाठा अवघा ८ टक्के म्हणजे ६८ एमसीएफटी इतकाच आहे. दररोज या पाणीसाठ्यात घटच होत आहे. लाभक्षेत्रासाठी हा चिंतेचा विषय बनला आहे.

कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये सध्या २३ हजार ८०३ एमसीएफटी म्हणजे ८० टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात २१ हजार ९८१ एमसीएफटी म्हणजेच ७४ टक्के इतका पाणीसाठा होता. यंदा ६ टक्के जादा पाणीसाठा आहे. ही लाभक्षेत्रासाठी जमेची बाजू आहे. मात्र कुकडी लाभक्षेत्रातील पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे यंदा उन्हाळी हंगाम शेतकऱ्यांची अग्निपरीक्षा पाहणारा ठरणार आहे.

येडगाव धरणातून १ हजार ४०० क्युसेकने पाणी कालव्याला सोडण्यात आले. श्रीगोंदा, पारनेरला एक टीएमसी पाणी देऊन हे आवर्तन बंद करण्यात येणार आहे. येडगावमध्ये ७३ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. माणिकडोह धरण ६२ टक्के भरले. धरणात ६ हजार २६० एमसीएफटी इतके पाणी आले आहे. डिंभे, वडज धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. डिंभे धरणातून घोड नदीत ५० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

पिंपळगाव जोगे धरणात २ हजार ४५४ एमसीएफटी ६३ टक्के इतके पाणी आले आहे. जामखेडचा खैरी तलाव ओव्हरफ्लो झाला असून मिरजगावचा सीना तलाव ८५ टक्के भरला आहे. ही लाभक्षेत्रासाठी समाधानाची बाब आहे.

----

कधी होणार डिंभे-माणिकडोह बोगदा?

कुकडी प्रकल्पातील ८० टक्के पाणीसाठा आहे. तरीही उन्हाळ्यात नगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागणार आहे. भविष्याच्या दृष्टीने डिंभे-माणिकडोह जोड बोगद्याचे काम हाती घेणे आवश्यक आहे. मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्नावर बैठक घेतली. गेल्या १० वर्षांत या प्रश्नी केवळ बैठकाच सुरू आहेत. मात्र यावर ठोस कार्यवाही काहीच झालेली दिसत नाही.

----

विसापूर तलावात पाणी सोडा

विसापूर तलावात अवघा आठ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस नसल्याने विसापूर तलावात कुकडीच्या चालू आवर्तनातून ३०० एमसीएफटी पाणी सोडावे. त्यानंतर विसापूरमधून लाभक्षेत्रासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी बेलवंडी येथील मनोज इथापे यांनी केली आहे.

Web Title: Increase in water for Ghod Dam