चोरांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:18 IST2021-01-15T04:18:16+5:302021-01-15T04:18:16+5:30

जामखेड : शहरातील गोडाउन गल्ली येथे बुधवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास केलेल्या मारहाणीत पती-पत्नी गंभीर जखमी झाले. पाच हजारांची रोकड, ...

Husband and wife injured in thieves' beating | चोरांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी

चोरांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी

जामखेड : शहरातील गोडाउन गल्ली येथे बुधवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास केलेल्या मारहाणीत पती-पत्नी गंभीर जखमी झाले. पाच हजारांची रोकड, ३२ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख अकरा हजारांचा ऐवज चोरांनी लंपास केला. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत गणेश राम जाधव (रा. आईस फॅक्टरी, जामखेड) यांनी फिर्याद दिली. बुधवारी रात्री गणेश जाधव यांच्या घरात जाण्यापूर्वी चोरट्यांनी आसपासच्या घरांच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली होती. पहाटे पावणेपाचच्या सुमारास घराच्या लोखंडी गेटचे व किचन शेजारील रूमचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

चाेरांनी घरात उचकावाचक सुरू केली. त्यावेळी गणेश जाधव व त्यांची पत्नी जागे झाले. त्यांनी घरात चोर काही तरी गडबड असल्याचे लक्षात आले. दरवाजा उघडून जाधव दाम्पत्याने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला असता, चोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. चोरांनी टोकदार लोखंडी रॉडने गणेश जाधव यांच्या तोंडावर वार केला, तसेच पाठीवर, पायावर रॉडने मारहाण केली. जाधव यांच्या पत्नीने आरडाओरड केली. चोरांनी पत्नीला दगड डोक्यात मारले. त्यामुळे त्यांची पत्नीही गंभीर जखमी झाली. चोरांनी गणेश जाधव यांच्या खिशातील तीनशे रुपये, पत्नीच्या अंगावरील मनी, गंठण, अंगठ्या असे ३२ ग्रॅम सोन्याचे दागिने, पर्समधील पाच हजाराची रोकड, मोबाइल असा एकूण एक लाख अकरा हजारांचा ऐवज चोरी गेला. माहिती समजताच पोलीस अधिकारी, कर्मचारी तेथे आले. त्यानंतर नगर येथून श्वान पथक बोलाविण्यात आले होते. श्वानाने शहरातील नागेश मंदिरापर्यंत माग काढला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर करीत आहेत.

Web Title: Husband and wife injured in thieves' beating