जनता पेटून उठली तरच सरकार झुकेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:24 IST2021-08-28T04:24:53+5:302021-08-28T04:24:53+5:30
देश बचाओ जनआंदोलन समितीशी ते बोलत होते. जनआंदोलन समितीने पत्रकार परिषद घेऊन तीन कृषी कायदे, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि ...

जनता पेटून उठली तरच सरकार झुकेल
देश बचाओ जनआंदोलन समितीशी ते बोलत होते. जनआंदोलन समितीने पत्रकार परिषद घेऊन तीन कृषी कायदे, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि देशात सुरू असलेले सरकारी कंपन्या विकण्याचं धोरण यावर केंद्र सरकारविरुद्ध आवाज उठविण्याचे आवाहन अण्णा हजारेंना केले होते, अन्यथा केंद्र सरकार आणि अण्णा हजारेंविरुद्ध राळेगणसिद्धीत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर शुक्रवारी देश बचाओ जन आंदोलन समितीचे पदाधिकारी अण्णांना भेटले. यावेळी ॲड. रवींद्र रणसिंग, रवींद्र देशमुख, मारुती भापकर, सागर आल्हाट, दुर्गा भोर, मुकुंद काकडे, ॲड. देवीदास शिंदे उपस्थित होते.
अण्णा म्हणाले की, माझे वय ८४ वर्षे आहे. मी किती वर्षे लढू? देश बचाओ जनआंदोलन समिती युवकांनी स्थापन केली, यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही लढा उभा करा, मी तुमच्यासोबत अवश्य येईल; मात्र त्याचवेळी देशात सरकारकडून मागणी नसताना लादण्यात येत असलेल्या कायद्यांवर, सरकारी कंपन्या विकण्याच्या धोरणांवर अण्णांनी खंत व्यक्त केली.
देशातील जनता कुंभकर्णासारखी झोपली आहे. ही जनता जोपर्यंत जागी होत नाही आणि सरकार बदलण्याची ताकद उभी करत नाही, तोपर्यंत सरकार झुकणार नाही. असेच कायदे आणि निर्णय लादण्यात येतील, असेही अण्णांनी सांगितले. शेतकरीविरोधी कायदे, वाढती महागाई, बेरोजगारी याविरुद्ध लढा देण्यासाठी तुम्ही संघटन उभे करा, मला जेव्हा वाटेल तुम्ही योग्य मार्गाने जात आहात, तेव्हा मी तुमच्या आंदोलनात अवश्य सहभागी होईल. मी जागा आहे, झोपलेलो नाही, असेही अण्णांनी सरकारला ठणकावून सांगितले.
--------------
दिल्लीतील आंदोलकांनी संपर्कच साधला नाही
दिल्लीत ८ महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला तुम्ही पाठबळ द्या, अशी विनंती मारुती भापकर यांनी केली. त्यावर हजारे म्हणाले की, दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्याशी संपर्क केला नाही, तसेच शेतकरी प्रश्नी पाच वर्षांपासून आपण पाठपुरावा करतोय. केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनीदेखील आपल्याला कृषी कायद्यांसंदर्भात उच्चस्थरीय समिती नेमण्याचा शब्द दिला आहे. कोरोनामुळे समिती स्थापन झाली नाही; मात्र तरी आपण पाठपुरावा करत आहोत, असे हजारे यांनी स्पष्ट केले.