मुलीवर अत्याचार करणार्‍यास जन्मठेप

By Admin | Updated: December 31, 2015 14:03 IST2015-12-31T14:03:10+5:302015-12-31T14:03:45+5:30

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपी किशोर शंकर पालवे (वय २0) याला जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

Girl rapist | मुलीवर अत्याचार करणार्‍यास जन्मठेप

मुलीवर अत्याचार करणार्‍यास जन्मठेप

 अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपी किशोर शंकर पालवे (वय २0, रा. मेहेकरी, ता. जि. अहमदनगर) याला जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आरोपीने अल्पवयीन मुलीवर औरंगाबाद येथे नेऊन मार्च २0१४ मध्ये अत्याचार केला होता.
दहावीची परीक्षा देण्यासाठी अल्पवयीन मुलगी (वय १५) जात असताना किशोर पालवे याने शाळेजवळ येऊन मुलीशी गोड बोलून लग्नाची मागणी घातली. सदर मुलीने लग्नास नकार दिल्याने किशोर याने तिला मोटारसायकलवर बसवून खुल्ताबाद (जि. औरंगाबाद) येथील एका लॉजवर तसेच वाळुंज (जि. औरंगाबाद) येथे नेऊन तेथे तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 
तपासी अधिकारी एस. एन. नरवडे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा न्यायाधीश यांच्यासमोर खटला सुरू असताना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुष्पा कापसे-गायके यांनी १६ साक्षीदार तपासले. कापसे यांचा युक्तीवाद, सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने किशोर पालवे यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 
लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम २0१२ प्रमाणे आरोपीला दोषी धरले. तसेच पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी कलम ३६६ अन्वये पाच वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. 

बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा-२0१२ अन्वये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास न्यायालयाने प्रथमच जन्मठेप ठोठावली आहे, अशी माहिती अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे-गायके यांनी दिली. अत्याचारीवर जरब बसविणारा हा कायदा असून यापुढे असे गुन्हे होवू नयेत, यासाठी आरोपींना अशा शिक्षा होणे गरजेच्या असल्याचे गायके म्हणाल्या. 
(प्रतिनिधी)

Web Title: Girl rapist