ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी मोफत बससेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:21 IST2021-09-25T04:21:04+5:302021-09-25T04:21:04+5:30
अहमदनगर : नगर शहर व परिसरातील ऐतिहासिक वास्तूंचे मोफत दर्शन होणार असून, महापालिकेच्या वतीने मोफत बससेवा लवकरच सुरू करण्यात ...

ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी मोफत बससेवा
अहमदनगर : नगर शहर व परिसरातील ऐतिहासिक वास्तूंचे मोफत दर्शन होणार असून, महापालिकेच्या वतीने मोफत बससेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पर्यटन दिनी येत्या सोमवारपासून ही सुरू केली जाणार आहे. तसा आदेश महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिला आहे. ऐतिहासिक वास्तूंच्या दर्शनासाठीचा महापालिकेचा हा पहिलाच उपक्रम आहे.
नगर शहराला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. शहरापासून जवळ अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. पाऊस झाल्याने सर्वत्र हिरवळ आहे. पर्यटनस्थळी सध्या चांगलीच गर्दी होत आहे. पार्श्वभूमीवर नगरच्या पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी महापालिकेच्यावतीने मोफत सेवा सुरू करण्यात येत आहे. ही सेवा शनिवार व रविवार, या सुटीच्या दिवशी उपलब्ध असणार आहे. प्रयोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून, नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्यास भविष्यातही ही सेवा सुरू ठेवली जाणार आहे.
शहरापासून काही अंतरावर भुईकोट किल्ला, दमडी मज्जिद, बागरोजा हडको, भिस्तबाग महल, फर्याबाग, चांदबीबी महल, पिंपळगाव माळवी तलाव, मेहरबाबा ट्रस्ट आदी पर्यटनस्थळे आहेत. शहरातून पर्यटनस्थळापर्यंत जाण्यासाठी बस उपलब्ध करून दिली जात असून, ही सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे. ऐतिहासिक वास्तूंची माहिती देण्यासाठी गाईडची नेमणूक करण्यात येणार आहे. महापालिकेचे प्रसिद्धी प्रमुख शशिकांत नजान यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
.....
- शहरापासून जवळ असलेल्या ऐतिहासिक वास्तूंची नगरकरांना माहिती व्हावी, यासाठी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच माहिती देण्यासाठी गाईडचीही नेमणूक करण्यात येणार आहे. पर्यटन दिनाचे औचित्य साधून मोफत बससेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. नागिरकांनी मोफत बससेवेचा लाभ घ्यावा.
- रोहिणी शेंडगे, महापौर