विळद घाटापासून मोर्चेकरी पायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2016 00:09 IST2016-09-24T00:01:03+5:302016-09-24T00:09:46+5:30

अहमदनगर : मराठा महा मूक मोर्चासाठी येणाऱ्या सकल मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांनी नगर-मनमाड रस्ता सकाळी सात वाजेपासून गर्दीने फुलला होता

Finding a milchir from Khilgh Ghat | विळद घाटापासून मोर्चेकरी पायी

विळद घाटापासून मोर्चेकरी पायी

अहमदनगर : मराठा महा मूक मोर्चासाठी येणाऱ्या सकल मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांनी नगर-मनमाड रस्ता सकाळी सात वाजेपासून गर्दीने फुलला होता. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चा विसर्जित झाल्याचे संयोजकांनी जाहीर केल्यानंतरही मराठा समाजाचे मोर्चेकरी विळद घाटातून नगरच्या दिशेने येतच होेते. सुमारे सात लाख लोक विळद घाटातून नगरच्या दिशेने आले असावेत असा अंदाज आहे. अकरा वाजेनंतर मनमाड रस्त्याच्या कडेला वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी सुरू झाली. मोर्चात सहभागी होण्याची ओढ असल्याने तब्बल तेरा किलोमीटर मोर्चेकऱ्यांनी पायपीट करत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
सकाळी सात वाजेपासूनच विळद घाटातून राहुरी, अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर तालुक्यातील सकल मराठा समाजाचे मोर्चेकरी नगरच्या दिशेने येण्यास सुरूवात झाली. बाह्यवळण रस्त्यापासूनच पोलिसांनी वाहतूक वळविल्याने फक्त मोर्चेकऱ्यांच्या वाहनांनाच नगर शहराच्या दिशेने प्रवेश दिला जात होता. विळद घाट पास करून पुढे येताच मोर्चेकऱ्यांना विखे फौंडेशनच्यावतीने नाश्ता व पाण्याचे पाऊच देण्यात आले.
सुमारे दोन लाख नाश्ता पाकिटे विखे फौंडेशनच्यावतीने मोर्चेकऱ्यांना वाटप करण्यात आले. नवनागापूर ग्रामस्थांनी एमआयडीसी परिसरात नाश्त्याची सुविधा केली होती. अप्पासाहेब सप्रे व त्यांचे सहकारी येणाऱ्या मोर्चेकऱ्यांचे हात जोडून स्वागत करत होते. बोल्हेगाव फाटा येथेही ग्रामस्थांच्यावतीने गरम पोहे नाश्ता म्हणून वाटप केले जात होते. बोल्हेगावचा उड्डाणपूल पार केल्यानंतर वाहनांच्या रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली. सावेडी नाका येथून मोर्चेकरी पायी चालले. बालिकाश्रम रस्ताही गर्दीने फुलून गेला होता.

Web Title: Finding a milchir from Khilgh Ghat