शेती व्यवसाय वृद्धीसाठी शेतकऱ्यांनी केव्हीकेचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:16 IST2021-07-18T04:16:04+5:302021-07-18T04:16:04+5:30

दहिगावने : शेतीच्या उत्पादन वाढीत तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली ही संस्था विविध कृषी व ...

Farmers support KVK for agribusiness growth | शेती व्यवसाय वृद्धीसाठी शेतकऱ्यांनी केव्हीकेचा आधार

शेती व्यवसाय वृद्धीसाठी शेतकऱ्यांनी केव्हीकेचा आधार

दहिगावने : शेतीच्या उत्पादन वाढीत तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली ही संस्था विविध कृषी व कृषिसंलग्न संशोधन केंद्रे, विद्यापीठे आणि कृषिविज्ञान केंद्राच्या माध्यमातून काम करीत आहे. कृषी विज्ञान केंद्र दहिगावनेच्या मदतीने शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती संरक्षित शेती वर्टीकल फार्मिंग व शेती संलग्न इतर व्यवसायांमध्ये वृद्धी करावी, असे आवाहन मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र घुले यांनी केले.

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या ९३ व्या ‘स्थापना दिनाचे’ औचित्य साधत कृषी विज्ञान केंद्र दहिगावने (ता. शेवगाव) येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. घुले अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी असलेला पदविका अभ्यासक्रम (डेसी) पास केलेल्या बॅच-२०१८-१९ च्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पदविका प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. भारताच्या अन्नधान्य स्वयंपूर्ती, दूध क्रांती, शेती संलग्न जोड व्यवसायाच्या उदारीकरणामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे मोठे योगदान आहे, असे कृषी विज्ञान केंद्र दहिगावनेचे प्रमुख डॉ. श्याम सुंदर कौशिक यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे विश्वस्त काकासाहेब शिंदे, प्रशासकीय अधिकारी के. वाय. नजन, डेसी अभ्यासक्रमाचे समन्वयक सुभाष कोरडे, प्राचार्य अशोक उगलमुगले, काकासाहेब घुले यांची प्रमुख उपस्थिती होती. सचिन बडधे यांनी सूत्रसंचालन केले. माणिक लाखे यांनी आभार मानले.

-----

१७ केव्हिके

कृषी विज्ञान केंद्र दहिगावने येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. नरेंद्र घुले यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Farmers support KVK for agribusiness growth