पक्षविरोधी काम करणाऱ्यांची हकालपट्टी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST2021-07-24T04:14:36+5:302021-07-24T04:14:36+5:30

अहमदनगर : आगामी विधानसभा व लोकसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार असल्याचे सांगून पक्षाच्या विरोधात पत्रकबाजी, आरोप करणाऱ्यांची तत्काळ हकालपट्टी ...

Expel those who work against the party | पक्षविरोधी काम करणाऱ्यांची हकालपट्टी करा

पक्षविरोधी काम करणाऱ्यांची हकालपट्टी करा

अहमदनगर : आगामी विधानसभा व लोकसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार असल्याचे सांगून पक्षाच्या विरोधात पत्रकबाजी, आरोप करणाऱ्यांची तत्काळ हकालपट्टी करा, असा आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील सारडा महाविद्यालयात भाजपची आढावा बैठक झाली. यावेळी माजी मंत्री राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड, शहराध्यक्ष महेंद्र गंधे आदी उपस्थित होते. सुरुवातीला पाटील यांनी शहराचा आढावा घेतला. शहर भाजपाच्या बैठकीत काहींनी तक्रारी केल्या. त्यावर पडदा टाकत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

भारतीय जनता पक्षात कोणीही परस्पर निर्णय घेणार नाही. प्रदेशकडून लोकसभा व विधानसभेचे उमेदवार ठरविले जातील. स्थानिक पातळीवर कोणताही निर्णय होणार नाही. पक्षाच्या विरोधात कुणी काम करत असेल तर, त्यांची गय करू नका. त्यांच्यावर कारवाई करा, असा स्पष्ट आदेश पाटील यांनी आढावा बैठकीत दिला. उत्तर नगर जिल्ह्याच्या बैठकीत नेवासा व कोपरगावमधील पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला. दक्षिण जिल्ह्याच्या बैठकीत पक्षविरोधात पत्रकबाजी व आरोप करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश पाटील यांनी दिला. ही कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार तालुका व जिल्हाध्यक्षांना असून, यापुढे पदाधिकाऱ्यांनीही स्पष्ट भूमिका घ्यावी, असे पाटील म्हणाले.

....

प्रदेशाध्यक्षांसमोरच शहराध्यक्ष हटविण्याची मागणी

आढावा बैठकीत भाजप हे एक कुटुंब आहे, असे प्रदेशाध्यक्ष सांगत असतानाच, भाजपचे भटक्या विमुक्त आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन शेलार यांनी शहराध्यक्षांची तक्रार केली. ते म्हणाले, मला कोरोना झालेला असताना पक्षाचे काम करता येत नसेल तर राजीनामा द्या, असे शहराध्यक्षांनी सांगितले. कोरोनाच्या काळात अशी वागणूक दिली गेली. त्यामुळे अशा शहराध्यक्षांना हटवा, अशी मागणी शेलार यांनी केली. त्यावर याबाबत वैयक्तिक बोलू, असे सांगून पाटील यांनी यावर पडदा टाकला.

.....

स्वयंघोषित उमेदवारांना चाप

विधानसभा निवडणुकीचे उमेदवार प्रदेशकडून ठरविले जातील, असे सांगून यापुढे कुणीही स्वत:ची उमेदवारी परस्पर जाहीर करू नये. पक्षाची शिस्त पाळा. पक्षाकडून दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे ताकद उभी करा, असे पाटील म्हणाले.

.....

शालिनी विखेंची उपस्थिती

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा सदस्या शालिनी विखे प्रथमच भाजपच्या बैठकीला उपस्थित होत्या. खासदार डॉ. सुजय विखे व आमदार राधाकृष्ण विखे बैठकीला उपस्थित नव्हते. जिल्हा परिषदेची निवडणूक शालिनी विखे यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढविलेली आहे.

.....

कोतकरांवर काय कारवाई केली

भाजपाचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीचा पंचा घालून स्थायी समितीचे सभापती पद घेतले. त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे शहराध्यक्षांकडून जाहीर करण्यात आले होते. त्यांच्यावर पक्षाने काय कारवाई केली, असा सवालही यावेळी काही कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

...

बोटावर मोजण्याइतक्याच नगरसेवकांची उपस्थिती

भाजपाचे महापालिकेत १५ नगरसेवक आहेत. परंतु, प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीला बोटावर मोजण्याइतकेच नगरसेवक उपस्थित होते. यावरही बैठकीत चर्चा झाली असून, अनुपस्थित नगरसेवकांबाबत शहराध्यक्ष काय भूमिका घेतात, याची चर्चा बैठकीनंतर काही पदाधिकाऱ्यांमध्ये होती.

Web Title: Expel those who work against the party