मुळा प्रवरा वीज संस्थेच्या निवडणुकीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:25 IST2021-08-27T04:25:25+5:302021-08-27T04:25:25+5:30

उक्कलगाव येथे बुधवारी भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीच्या विकास कामांचे भूमिपूजन ...

Election of Mula Pravara Power Corporation | मुळा प्रवरा वीज संस्थेच्या निवडणुकीचे वेध

मुळा प्रवरा वीज संस्थेच्या निवडणुकीचे वेध

उक्कलगाव येथे बुधवारी भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीच्या विकास कामांचे भूमिपूजन झाले. यावेळी मुरकुटे यांनी मुळा प्रवरा संस्थेच्या शेअर्सच्या भांडवलात वाढ करण्याच्या निर्णयाला जाहीर विरोध केला.

संस्थेचे अध्यक्ष हे खासदार डॉ. सुजय विखे आहेत. त्यांनी शेअर्सचे भांडवल वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बंद स्थितीतील संस्थेच्या शेअर्सकरिता ही वाढीव दीडशे रुपयांची रक्कम भरण्यास सभासद तयार होणार नाहीत. संस्थेचे अध्यक्ष खासदार डॉ. विखे हे कोणत्याही सभासदांच्या मतदानाचा अधिकार निवडणुकीत हिरावून घेणार नाहीत, असे सांगत आहेत. मात्र सांगितलेली गोष्ट प्रत्यक्षात खरी होत नाही, असे मुरकुटे यावेळी म्हणाले.

यापूर्वी लोणी येथे झालेल्या संचालक मंडळाच्या सर्वसाधारण सभेतही मुरकुटे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचीही भूमिका संस्थेच्या राजकारणात महत्त्वाची ठरणार आहे.

----------

संस्था सुरू करण्याची तयारी

मुळा प्रवरा वीज संस्थेचा वीज वितरणाचा परवाना संपला आहे. त्यामुळे ती बंद स्थितीत आहे. मात्र संस्था पुन्हा सुरू करावयाची असल्याचे मुरकुटे म्हणाले. त्याकरिता आपली विखे यांना सहकार्य करण्याची भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

-----------

निवडणुकीचे वेध

संस्थेच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे. पुढील काळात निवडणुकीचे संकेत आहेत. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील सभासदांच्या याद्यांची चाचपणी करण्याचे काम मुरकुटे गटाकडून हाती घेण्यात आले आहे. संस्थेचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, ‘अशोक’चे संचालक व बेलापूरचे उपसरपंच अभिषेक खंडागळे व हिम्मत धुमाळ यांच्याकडे तशी जबाबदारी देण्यात आली आहे.

--------------

Web Title: Election of Mula Pravara Power Corporation