कोरोनाची वक्रदृष्टी असतानाही विसापूर कारागृहाला मिळाले ४५ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST2021-06-10T04:15:31+5:302021-06-10T04:15:31+5:30

विसापूर : कोरोनाची वक्रदृष्टी असतानाही श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील खुल्या जिल्हा कारागृहाने यंदा ४५ लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. कैदी ...

Despite Corona's crooked vision, Visapur Jail got an income of Rs 45 lakh | कोरोनाची वक्रदृष्टी असतानाही विसापूर कारागृहाला मिळाले ४५ लाखांचे उत्पन्न

कोरोनाची वक्रदृष्टी असतानाही विसापूर कारागृहाला मिळाले ४५ लाखांचे उत्पन्न

विसापूर : कोरोनाची वक्रदृष्टी असतानाही श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील खुल्या जिल्हा कारागृहाने यंदा ४५ लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. कैदी गेल्या वर्षभरापासून पॅरोल रजेवर असल्याने कारागृहाचे अधिकारी, कर्मचारी शेतीत राबले.

मागील वर्षी लॉकडाऊनपूर्वी या कारागृहात ९७ कैदी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्व कारागृहांतील बहुसंख्य कैदी पॅरोलवर पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विसापूर कारागृहात गेल्या वर्षभरापासून केवळ दहा ते पंधरा कैदी आहेत. सक्षम मनुष्यबळाअभावी शेती करणे अवघड झाले होते. त्यामुळे कारागृहाच्या शेती उत्पन्नात घट झाली आहे. शेतीमध्ये राबण्यासाठी हात कमी असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याची कमतरता भासू नये म्हणून स्वत: थांबण्याचा निर्णय घेतला. सन २०१०-२० या आर्थिक वर्षात कारागृहाच्या शेतीतून ६५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र, २०२०-२१ या आर्थिक वर्षात पंचेचाळीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. कारागृहाचे अधिकारी व कर्मचारी यांनी शेतीबरोबरच कुक्कुट पालन, शेळीपालन व जनावरांच्या देखभालीतून हे उत्पन्न मिळविले आहे.

कोरोनामुळे वर्षभरापासून कारागृहाचे वॉशिंग सेंटर बंद आहे. कारागृहाचे अधीक्षक प्रदीप जगताप, वरिष्ठ तुरुंगाधिकारी प्रकाशसिंग परदेशी, तुरुंगाधिकारी बाळकृष्ण जासूद व राजेंद्र पवार हे स्वत: लक्ष देऊन कर्मचाऱ्यांबरोबर शेतीत राबण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी कारागृहाच्या शेतीतून भाजीपाला पिकवून पुणे, मुंबई, ठाणे व नाशिक येथील कारागृहांना पुरवठा केला जात असे. मात्र, मागील वर्षी सक्षम मनुष्यबळ नसल्याने नेहमीप्रमाणे भाजीपाला पिकविणे कारागृहाला शक्य झाले नाही. त्यामुळे कारागृहाने यावेळी ऊस, तूर, गहू व ज्वारी ही पिके घेतली.

--

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदीवान पॅरोल सुटीवर पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे कारागृहाच्या शेतीसाठी मनुष्यबळाची कमतरता भासत आहे, तरीही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने शेती पडीक पडू न देता पिके काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी बारामती येथील नर्सरीतून उसाची रोपे उपलब्ध करण्यात आली. कारागृहात आहे त्या बंदीवानांची मदत घेऊन कर्मचाऱ्यांनी पाच एकर नवीन उसाची लागवड केली आहे.

-प्रदीप जगताप,

अधीक्षक, खुले जिल्हा कारागृह, विसापूर

---

०९ विसापूर

विसापूर कारागृहाच्या उसाच्या शेतीत राबणारे अधिकारी, कर्मचारी.

Web Title: Despite Corona's crooked vision, Visapur Jail got an income of Rs 45 lakh