कोरोना वाढतोय, पण कशामुळे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:16 IST2021-07-18T04:16:18+5:302021-07-18T04:16:18+5:30

अहमदनगर : जिल्ह्याच्या काही भागात कोरोना वाढत आहे; मात्र हा कोरोनाचा संसर्ग नेमका कशामुळे वाढत आहे ? याबाबतच्या कारणांचा ...

Corona is growing, but why? | कोरोना वाढतोय, पण कशामुळे ?

कोरोना वाढतोय, पण कशामुळे ?

अहमदनगर : जिल्ह्याच्या काही भागात कोरोना वाढत आहे; मात्र हा कोरोनाचा संसर्ग नेमका कशामुळे वाढत आहे ? याबाबतच्या कारणांचा शोध घ्यावा, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी तालुकास्तरीय यंत्रणेला दिले आहेत. गावात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांनी कडक उपाययोजना कराव्यात. कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशाही सूचना बैठकीत देण्यात आल्या.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. त्याचा आढावा निवासी उपजिल्हाधिकारी निचित यांनी शनिवारी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. उपविभागीय अधिकारी (श्रीगोंदा -पारनेर) सुधाकर भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भागवत दहिफळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदी जिल्हा मुख्यालय येथून तर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे तालुका स्तरावरून बैठकीत सहभागी झाले होते.

यावेळी निचित म्हणाले, सध्या जिल्ह्याच्या काही भागात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामागील कारणे शोधून संसर्ग साखळी तोडण्याचे आव्हान तालुकास्तरीय यंत्रणांसमोर आहे. त्यामुळे या यंत्रणांनी तत्काळ अशा गावांत जाऊन तेथील रुग्णवाढीची कारणे शोधून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. रुग्ण आढळून येणारा भाग प्रतिबंधित करण्यात यावा, जेणेकरुन संसर्ग पसरणार नाही. कोरोना सुसंगत वर्तणुकीचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कडक कारवाई करावी.

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आवश्यक ऑक्सिजनसाठी कार्यवाही करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पूर्वीच निर्देश दिले आहेत. ऑक्सिजन साठवण्यासाठीची व्यवस्था, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणी, जम्बो सिलिंडर, ड्युरा सिलिंडरची व्यवस्था यासंदर्भात त्या-त्या तालुक्यातील हॉस्पिटल्सकडून पूर्तता करुन घेणे आवश्यक असल्याचे निचित यांनी स्पष्ट केले.

---

गावपातळीवर अशी खबरदारी हवी

रुग्ण असलेल्या गावात पथके कार्यरत करणे

तलाठी, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील यांच्यावर जबाबदारी

गर्दी होणारे कार्यक्रम टाळणे

सार्वजनिक ठिकाणे, बाजार, दुकानांमध्ये नियमांचे पालन करणे

रुग्ण आढळून येणाऱ्या भागात तपासणी मोहीम राबविणे

-------------

Web Title: Corona is growing, but why?