अहमदनगर शहरात कोरोनाचा विस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:20 IST2021-03-26T04:20:58+5:302021-03-26T04:20:58+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात फेब्रुवारीपासून सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या महिन्यात नगर शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा तळाला होता. ...

अहमदनगर शहरात कोरोनाचा विस्फोट
अहमदनगर : जिल्ह्यात फेब्रुवारीपासून सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या महिन्यात नगर शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा तळाला होता. मार्चच्या सुरुवातीला कोरोना रुग्णांचा आलेख वाढत जावून गुरुवारी सर्वोच्च ४५७ रुग्णांची नोंद झाली. आता नागरिकांनी अधिक दक्ष राहण्याची गरज यामुळे निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव आणि राहाता हे तीन तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. नगर शहरात चालू महिन्याच्या सुरुवातीला दरराेज साधारण ४० ते ५० रुग्णांची नोंद होत होती. मागील आठवड्यात हा आकडा २०० वर पोहोचला होता. तो गुरुवारी अचानक ४५७ झाला. आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. अचानक वाढलेली रुग्ण संख्या नगरकरांची चिंता वाढविणारी आहे. जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेल्या चाचणीत १९४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. खाजगी प्रयोगशाळेतील २२३ जण, तर अँटिजन चाचणीत ४० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण खाजगी प्रयोगशाळेतील आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या अचानक १ हजार ३२८ झाली असून, ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांचा आलेख वाढतो आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सार्वजनिक ठिकाणी गर्दीत तसूभरही फरक पडलेला नाही. नियमांचे पालन होत नसल्याने प्रशासनाचीही चिंता वाढली असून, कोरोनाचा प्रदुर्भाव राेखण्याचे मोठे आव्हान प्रशासकीय यंत्रणेसमोर आहे. नगर शहरात वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. महापालिका आयुक्त शंकर गोरे व उपायुक्त यशवंत डांगे यांनी गुरुवारी दुपारी महापालिकेच्या जुन्या कार्यालयात कोरोनाबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
....
खवय्यांची बेफिकिरी
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अहमदनगर शहरातील आनंदधाम, दिल्लीगेट ,प्रोफेसर चौक, कापडबाजार, भिस्तबाग चौक, पारिजात चौक, बालिकाश्रम रोड आदी ठिकाणी रात्रीच्या वेळी खवय्यांची गर्दी होताना दिसत आहे. मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याने कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची चिन्हे आहेत.
.....
मनपाकडून एक लाखांचा दंड वसूल
महापालिकेच्या भरारी पथकाने सोशल डिस्टन्सिंग, मास्क न वापरणाऱ्या २२६ जणांवर कारवाई केली असून, आतापर्यंत १ लाख १७ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. पथकाकडून कारवाई सुरू आहे.
....