वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास होऊ शकतो घरात कायमचा अंधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:24 IST2021-08-26T04:24:05+5:302021-08-26T04:24:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : वीजचोरी रोखण्याचे मोठे आव्हान महावितरण कंपनीसमोर आहे. घरे, दुकानांच्या बाहेर बसवलेल्या वीज मीटरमध्ये फेरफार ...

Changing the electricity meter can cause permanent darkness in the house! | वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास होऊ शकतो घरात कायमचा अंधार !

वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास होऊ शकतो घरात कायमचा अंधार !

लोकमत न्यूज नेटवर्क

संगमनेर : वीजचोरी रोखण्याचे मोठे आव्हान महावितरण कंपनीसमोर आहे. घरे, दुकानांच्या बाहेर बसवलेल्या वीज मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केली जाते. महावितरणच्या संगमनेर विभागात संगमनेर, अकोले, कोपरगाव आणि राहाता या चार तालुक्यांचा समावेश आहे. या विभागात दोन वर्षांत वीजचोरी करणाऱ्या ५ हजार ४४३ जणांवर महावितरणकडून कारवाई करण्यात आल्याचे महावितरण कंपनीकडून सांगण्यात आले. वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास घरात कायमचा अंधार होऊ शकतो. तसेच दंडात्मक कारवाईसह फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊ शकतात.

जुना कायदा जाऊन नवीन कायदा आला. नवीन कायद्यात वीजचोरी दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा ठरविण्यात आला आहे. नवीन कायद्यामुळे वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. वीजचोरीला आळा बसावा यासाठी महावितरण कंपनीतर्फे वीजचोरीविरोधात सातत्याने मोठ्या प्रमाणात मोहिमा राबविण्यात येतात. तरीदेखील काही वीजग्राहक नवनवीन युक्ती राबवून वीजचोरी करत असतात. महावितरणतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘वीजचोरी कळवा बक्षीस मिळवा’ या योजनेमध्ये वीजचोरीबाबत माहिती देणाऱ्यांना आतापर्यंत लाखो रुपये रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात आले आहेत.

२०१५-१६, २०१६-१७ आणि २०१७-१८ या आर्थिक वर्षात स्रोतांकडून मिळालेल्या वीजचोरीच्या माहितीनुसार भरारी पथकाने केलेल्या कारवाईत ४ कोटी १० लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस झाली होती. ही रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात आली होती. वीजग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटचे बिल भरणे अपरिहार्य असताना वीजबिल चुकविण्यासाठी काही जण वीज मीटरमध्ये फेरफार करून महावितरण कंपनीची फसवणूक करतात. वीजचोरी उघड झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध दंडात्मक तसेच फौजदारी स्वरूपाची कारवाईदेखील करण्यात येते. संगमनेर विभागातील चार तालुक्यात जे वीजग्राहक वीजचोरी करताना आढळून आले, त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच काहींवर कोर्ट केसेस दाखल करण्यात आल्याचे महावितरण कंपनीच्या संगमनेर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

--------------------

वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

वर्ष कारवाईची संख्या

२०१९-२०२० ३५४२

२०२०-२०२१ १९०१

महावितरण संगमनेर विभाग, (संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता अकोले तालुके)

Web Title: Changing the electricity meter can cause permanent darkness in the house!