राहुरी : ब्राम्हणी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या १३ गाळ्यांची जाहीर लिलाव प्रक्रिया गुरुवारी (दि. २३) पार पडली. यात ११ गाळ्यांसाठी बोली लागून ग्रामपंचायतीच्या तिजोरीत ७० लाख ५० हजार रुपयांची गंगाजळी आली, तर इतर दोन गाळ्यांवर कोणीही बोली लावली नाही. त्यामुळे ते शिल्लक राहिले.
ब्राम्हणी येथील नवीन बाजारतळ येथे ही लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलाव प्रक्रियेत ४१ व्यक्तींनी अनामत रक्कम भरून बोलीसाठी सहभाग घेतला होता. पुढील गाळे ३ लाख ५० हजार व मागील बाजूचे ३ लाख ३५ हजार या प्राथमिक रकमेवरून बोली लावण्यास सुरुवात झाली. एका गाळ्यासाठी सर्वात अधिक ९ लाख ३२ हजार रुपयांची बोली लावली. बोलीसाठी चढाओढ झाल्याने लिलावात रंगत वाढली होती. लिलाव प्रक्रिया पार पाडण्यासाठी विस्तार अधिकारी मुळे, शाखा अभियंता हंचे, ग्रामविकास अधिकारी माणिक घाडगे, श्रीकांत साळे, भिंगारदे, आदी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पंचायत समिती सदस्य सुरेश बानकर, सरपंच प्रकाश बानकर, बाळकृष्ण बानकर, ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ मोकाटे, बाळासाहेब देशमुख, माणिक तारडे, दादासाहेब हापसे, विजय बानकर, प्रेमसुख बानकर, महेंद्र तांबे, श्रावण वैरागर, गणेश हापसे आदी प्रयत्नशील होते. लिलावादरम्यान ज्यांनी गाळे घेतले त्यांचा फेटा बांधून ग्रामपंचायतीतर्फे सत्कार करण्यात आला.