शंभरीच्या उंबरठ्यावरील भंडारदरा धरणाचे होणार मजबुतीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:24 IST2021-08-28T04:24:55+5:302021-08-28T04:24:55+5:30
अकोले : ब्रिटिशकालीन भंडारदरा उभारणीस ९५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यावेळी ८४ लाख रुपये खर्चून हे धरण बांधण्यात ...

शंभरीच्या उंबरठ्यावरील भंडारदरा धरणाचे होणार मजबुतीकरण
अकोले : ब्रिटिशकालीन भंडारदरा उभारणीस ९५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यावेळी ८४ लाख रुपये खर्चून हे धरण बांधण्यात आले आहे. १९७३ च्या कालावधीत धरण मजबुतीकरणाची कामे झाली. आता धरणाची शतकी वाटचाल लक्षात घेता धरण पुनर्बांधणी व सुधारणा प्रकल्पांतर्गत धरण मजबूत करण्यासाठी ७३ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
शेती सिंचनासाठी पाट-कालवेनंतर गूळ-चुनाखडी वापरुन दगडात रेखीव भक्कम धरणाची उभारणी करुन साकारलेल्या ‘अर्थर लेक’ मधील पाणीसाठ्याच्या आधारावरच लाभक्षेत्रात बागायत फुलले. १८७५ श्रीरामपूर भागात पाण्यासाठी कालवे झाले. कालव्यांना पाणी मिळावे म्हणून संगमनेर जवळ ओझर येथे १९८५ ला पिकअप वाॅल बांधण्यात आली. आजही येथूनच भंडारदरा पाटपाण्याचे वितरण होते. २३ हजार ७७ हेक्टर सिंचन क्षमतेच्या भंडारदरा धरणाची आधी कालवे मग धरण अशी ख्याती आहे. ओझर उन्नेय बंधाऱ्यापासून पुढे डावा कालवा ७६ व उजवा कालवा ५३ किलोमीटर लांबीचा आहे. १९०५ ला धरणाच्या जागेचे सर्वेक्षण होत १९१० ला धरणाच्या कामास सुरुवात झाली. १९२६ ला दगड-गूळ चुण्यातील या धरणाचे काम पूर्ण झाले. १९२२ ला धरणात पाणी साठवायला सुरुवात झाली असून धरणाचे पाणलोट क्षेत्र १२१ चौरस किलोमीटर इतके आहे. जिल्ह्याला जलसंजीवनी मिळावी म्हणून त्यावेळी साधन सामुग्री फारशी नसतानाही केवळ १६ वर्षांत धरण तयार झाले. धरणाची भिंत २७८ फूट उंच असून केवळ ८४ लाख १४ हजार १८८ रुपये धरणासाठी खर्च झाले आहेत.
१९७३ ला भंडारदरा धरणाच्या भिंतीचे बळकटीकरण करण्यात आले. त्यात १३१ बोअर घेऊन त्यात शिसे ओतण्यात आले असून त्यामुळे ५४० टनाने भिंतीची दाब क्षमता वाढली आहे. तसेच १९४ बोअर घेऊन त्यात प्री स्ट्रेस केबल टाकण्यात आली आहे. केबलचे वजन २१० टन व लांबी १० हजार ५५३ फूट आहे. बळकटीसाठी १४ ‘बटरेस’ बांधण्यात आले आणि ‘स्पिल वे’ गेट बसविण्यात आले. यातून प्रतिसेकंदाला ५३ हजार क्युसेक पुराचे पाणी वाहून जाऊ शकते.
सह्याद्रीचा काळापाषाण ‘बेसॉल्ट’ खडकावर ८५ मीटर उंचीचा ११०३९ दलघफू इतका पाणीसाठा कवेत घेऊन जलमंदिर दिमाखात उभे आहे. स्वीझर्लंड बनावटीचे व्हॉल्व्ह बसवून सिंचन मोऱ्या तयार केलेल्या आहेत. येथील खडकाची दाब सहन करण्याची क्षमता ७ हजार मेट्रिक टन इतकी आहे. बुडीत पाणलोट २१ किलोमीटर लांब असून जवळपास ६० मीटरपर्यंत पाण्याचा दाब असतो. या पाण्याचा ६० टक्के दाब जवळच्या टेकडीवर स्थिरावतो व केवळ ४० टक्के दाब हा भिंतीवर येतो, असे ‘अभियांत्रिकी तंत्र’ धरणासाठी वापरण्यात आले आहे. तर कोकणात पाणी वाहून जाऊ नये म्हणून ब्रिटिशांनी साम्रद जवळ ३५० मीटर लांबीचा ‘सॅडल डॅम’ही बांधला आहे.
.......................
पहिल्या टप्प्यात ७३ कोटींचे काम
सध्या धरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात ७३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यात धरण भिंत व सांडवा बळकटीकरण, व्हाॅल्व्ह दुरुस्ती, मूलभूत सुविधा निर्मिती, रस्ते, विद्युतीकरण, यांत्रिकी कामे प्रस्तावित आहेत. राज्याच्या धरण सुरक्षितता संघटना पथकामार्फत केंद्रीय जलआयोग यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. जागतिक बँक व केंद्र शासन यांच्याकडून राज्यांना धरण पुनर्स्थापना व सुधारणा यासाठी निधी दिला जातो. धरण मजबूत करण्याच्या कामास लवकरच सुरुवात होईल असे कार्यकारी अभियंता गणेश न्नानोर व सहायक अभियंता अभिजित देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.