अहमदनगर : दहावीचा निकाल लागल्यानंतर आता अकरावी प्रवेशाचे वेध विद्यार्थ्यांना लागले आहेत. मात्र, या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अडथळ्यांची शर्यत पार करण्याची वेळ आली आहे. दहावी निकालाच्या वेळी बंद पडलेली वेबसाइट आता अकरावी सीईटी प्रवेश प्रक्रियेतही बंदच असल्याने विद्यार्थी, पालक हैराण झाले आहेत.
अकरावी प्रवेशासाठी यंदा शासनाने सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे, पण ही परीक्षा ऐच्छिक ठेवली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात ७६ हजार अकरावीच्या जागा आहेत. त्या तुलनेत दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी केवळ ७० हजार आहेत. म्हणजे सुुमारे ६ हजार जागा जास्त आहेत. त्यामुळे प्रवेश सर्वांनाच मिळणार आहे, पण नामांकित महाविद्यालयांना प्रवेश घ्यायचा असेल, तर सीईटीतील गुण महत्त्वाचे ठरणार आहेत. सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य मिळणार आहे. परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना रिक्त राहिलेल्या जागांवर दहावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश मिळेल, परंतु रिक्त राहणाऱ्या जागेची वाट न पाहता, मोठ्या संख्येने विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी नोंंदणी करत आहेत. मात्र, या नोंदणीत पहिल्या दिवसापासूनच अडथळे येत आहेत.
----------------
असे असेल परीक्षेचे स्वरूप
- परीक्षा दहावीच्या इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र या चार विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
- १०० गुणांची प्रश्नपत्रिका राहणार असून, यात इंग्रजी २५, गणित २५, विज्ञान व तंत्रज्ञान २५, सामाजिक शास्त्रे २५ असे गुण विभाजन असेल.
- राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क लागणार नाही. मात्र, इतर बोर्डाच्या व सत्र २०२०-२१ पूर्वीच्या विद्यार्थ्यांना १७८ रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल.
- परीक्षा केंद्रासंदर्भात विद्यार्थ्यांनी नमूद केलेला तालुका व शहरी भाग विचारात घेतला जाईल.
- परीक्षा केंद्रासंदर्भात विद्यार्थ्यांनी नमूद केलेला तालुका व शहरी भाग विचारात घेतला जाईल.
- दहावीच्या ७५ टक्के अभ्यासक्रमावरच परीक्षेत असणार प्रश्न.
- परीक्षा ऑफलाइन राहणार असून, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे राहील.
- सेमी इंग्रजीची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयावरील प्रश्न इंग्रजीत राहणार व सामाजिक शास्त्र विषयातील प्रश्न त्यांनी निवड केलेल्या भाषेत राहणार.
----------------
दहावी पास विद्यार्थी - ७०,५६६
अकरावीसाठी एकूण जागा - ७६.६००
कला शाखा - २९,६००
वाणिज्य शाखा - १०,९००
विज्ञान शाखा - ३४.०००
--------------
सीईटी वेबसाइट हँग
राज्य शिक्षण मंडळाने सीईटी परीक्षेचे आयोजन २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत केले आहे. त्यासाठी २० जुलैपासून http://cet.mh-ssc.ac.in या वेबसाइटवर अर्ज भरण्याचे सांगितले आहे, परंतु पहिल्या दिवसापासूनच ही वेबसाइट बंद झाली असून, शिक्षण मंडळाने ही वेबसाइट तात्पुरती बंद असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आपला अर्ज कधी भरेल, याची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना लागली आहे.
------------
दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित अकरावी सीईटीचा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा दहावीची उजळणी करून सीईटी द्यावी. दहावीची परीक्षा न दिल्याची सल अनेकांना आहे. या सीईटीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी आहे.
- प्रा.महेश पाडेकर, अकोले