बाप्पा राज्यातील सर्व शाळा सुरळीत सुरू कर रे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:22 IST2021-09-18T04:22:29+5:302021-09-18T04:22:29+5:30

केडगाव : देवा गणराया गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील शाळा बंद आहेत. घरात कोंडल्यासारखे वाटते. शाळेत जाऊन शिकायचे, खेळायचे, बागडायचे, ...

Bappa, start all the schools in the state smoothly. | बाप्पा राज्यातील सर्व शाळा सुरळीत सुरू कर रे..

बाप्पा राज्यातील सर्व शाळा सुरळीत सुरू कर रे..

केडगाव : देवा गणराया गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील शाळा बंद आहेत. घरात कोंडल्यासारखे वाटते. शाळेत जाऊन शिकायचे, खेळायचे, बागडायचे, मित्रांसोबत खूप गप्पा मारायच्या आहेत. मात्र त्यासाठी राज्यातील सर्व शाळा सुरू कर रे. शिक्षणात सुरू असलेले सर्व विघ्न तू दूर कर, असे साकडेच आदर्शगाव हिवरे बाजारच्या (ता. नगर) येथील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी गणरायाला सामूहिक आरती करताना घातले.

कोरोना महामारीमुळे १४ मार्च २०२० पासून राज्यातील शाळा बंद आहेत. विद्यार्थी मोबाइलवरील ऑनलाइन अभ्यासालाही कंटाळले आहेत. सततच्या मोबाइल वापराचे दुष्परिणामही काही मुलांमध्ये दिसू लागले आहेत. बहुतांशी मुले शिक्षणापासून वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर हिवरेबाजारच्या मुलांनी गणपतीला शाळा सुरू करण्याबाबत साकडे घातले.

आदर्शगाव हिवरेबाजारला १५ जूनपासूनच प्रत्यक्ष शाळा सुरू झाली. गाव कोरोनामुक्त असल्याने गावातील प्राथमिक, माध्यमिक अशा इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतची शाळा हिवरेबाजारमध्ये नियमित सुरू आहे. विशेष म्हणजे मुलांची हजेरीही उत्कृष्ट आहे. गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळेत दरवर्षीप्रमाणे गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. शुक्रवारी सर्व मुलांनी आरतीच्या वेळी थेट विघ्नहर्त्या गणरायालाच साकडे घातले.

बाप्पा गणराया आमची शाळा या वर्षीपासून नियमित सुरू झाली. मात्र राज्यातील इतर शाळा बंदच आहेत. आमची शाळा सुरू असल्याने आम्ही आनंदी आहोत. शाळेत शिकतो, खेळतो, मस्ती करतो. मात्र आम्ही जसे आमच्या मित्र-मैत्रिंणीसोबत आनंदाने खेळत आहोत तसाच आनंद तू राज्यातील इतर मुलांना मिळू दे. सर्वांच्या शाळा सुरू करून सर्वांना आपल्या शाळेतील मित्रांना भेटू दे, अशी प्रार्थना केली.

हिवरेबाजारची शाळा शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून प्रत्यक्ष सुरू आहे. गणपतीच्या आरतीच्या वेळी मुलांनी जे साकडे घातले ही त्यांच्या मनात आलेली भावना होती. याबाबत आम्ही राज्य सरकारला साकडे घालणार नाही. शाळा सुरू करण्याचा विषय हा धोरणात्मक आहे. मुलांनी फक्त त्यांची भावना गणरायासमोर मांडली.

पोपटराव पवार,

कार्याध्यक्ष, आदर्श गाव कृती समिती

-----

१७ हिवरेबाजार

हिवरेबाजार येथे गणरायाला राज्यभरातील शाळा सुरू होण्याबाबत साकडे घालताना शाळकरी विद्यार्थी, विद्यार्थिनी.

Web Title: Bappa, start all the schools in the state smoothly.