सरकार अस्थिर करण्याचा भाजपा नेत्यांचा केविलवाणा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:16 IST2021-07-18T04:16:22+5:302021-07-18T04:16:22+5:30
शनिवारी (दि. १७) नगर मार्गे जाताना देसाई हे काही वेळ शहरात थांबले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देसाई ...

सरकार अस्थिर करण्याचा भाजपा नेत्यांचा केविलवाणा प्रयत्न
शनिवारी (दि. १७) नगर मार्गे जाताना देसाई हे काही वेळ शहरात थांबले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देसाई यांचे शासकीय विश्रामगृहात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वागत केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिकमध्ये बोलताना रात्रीतून एका नेत्याला अटक होणार असल्याचे सूतोवाच केले होते. याकडे लक्ष वेधले असता देसाई म्हणाले, एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी इतर नेत्यांच्या अटकेची भविष्यवाणी करणे, ही बाब कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही. याबाबत केंद्रीय तपास संस्थांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या पाहिजेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खासदार शरद पवार यांची भेट ही महाराष्ट्राच्या प्रश्नावर झाली असणार आहे. त्यामध्ये राजकारण नाही. संसदेच्या अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री राज्यातील प्रश्नांसाठी खासदारांची बैठक बोलाविण्याची पद्धत आहे. त्यानुसारच पवार हे मोदी यांना भेटले असावेत. विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णयही तिन्ही पक्ष एकत्रित घेतील. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनीही तिन्ही पक्षांनी मिळून निर्णय घेतला तर आपण अध्यक्षपद सांभाळू असेच सांगितले आहे. त्यामुळे हा विषयही स्पष्ट असल्याचे देसाई यांनी सांगितले.
-----------
पोलिसांच्या नियमितपणे बदल्या होणार
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आवश्यक आहेत त्या सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. पोलिसांच्या बदल्या हा नियमित प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे कार्यकाल संपलेल्या पोलिसांच्या नियमाप्रमाणे बदल्या होतील, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.
----------------
वारी बाबत सरकारचे सैल धोरण
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत पंढरपूरच्या वारी बाबत सरकारने अधिक सैल धोरण घेतले आहे. मागीलवर्षी मानाच्या पालखी बरोबर केवळ ५० वारकऱ्यांना परवानगी दिली होती. यंदा १०० वारकऱ्यांना परवानगी दिली आहे. तसेच दोन बस त्यांच्यासाठी दिल्या आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांचे प्रतिनिधींशी अनेकवेळा संवाद साधून निर्णय घेतला आहे. पायी वारी असेल तर गावागावात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पायी वारीला मनाई करण्यात आली असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.