मराठा+मराठी एकी दोघांच्याही फायद्याची; इच्छा ६४ टक्के 'मतदारांची'!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 05:50 PM2019-02-02T17:50:02+5:302019-02-02T18:15:17+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात महाआघाडीची मोठी फळी उभी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार जोमाने प्रयत्न करताहेत. देशभरातले स्थानिक पक्षांना महाआघाडीत सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय. या 'मिशन' अंतर्गतच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं 'इंजिन'ही महाआघाडीला जोडलं जाण्याच्या हालचाली सुरू असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात आहे.

राज ठाकरे यांनी 'पवारकाकां'कडे तीन जागांचा प्रस्ताव पाठवलाय आणि त्यावर विचारही सुरू असल्याचं कळतंय. हे 'मनसे मीलन' झाल्यास राज ठाकरेंना त्याचा फायदा होईल का, या संदर्भात लोकमत डॉट कॉमने जनमताचा कौल घेतला. त्यात, तब्बल ६४ टक्के 'मतदारांनी' राज ठाकरेंना राष्ट्रवादीला 'टाळी' देण्यास हिरवा कंदील दिला आहे.

मोदी लाटेचा फटका जसा काँग्रेस-राष्ट्रवादीला बसला, तसाच तो मनसेलाही बसला आहे. नाशिकमध्ये त्यांना सत्ताच गमवावी लागली आणि इतरत्रही बरीच पडझड झाली. त्यामुळे मनसेलाचा 'नवनिर्माणा'ची गरज आहे. याची जाणीव झाल्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा दौरा केला. त्यात त्यांची 'क्रेझ' टिकून असल्याचं दिसलं. ती गर्दी पवारांनीही पाहिली आणि बरीच गणितं मांडली.

वास्तविक, राष्ट्रवादी आणि मनसे हे दोन भिन्न प्रवृत्तीचे पक्ष. परंतु, 'राजा'ला भक्कम साथ हवीय आणि राष्ट्रवादीला एक मजबूत हात. मोदीविरोध हा दोघांमधला समान धागा आहे. या धाग्यानेच शरद पवार आणि राज ठाकरे यांना अधिक जवळ आणल्याचं चित्रही अलीकडच्या काळात पाहायला मिळालं.

राज ठाकरे आपल्या व्यंगचित्रांमधून सातत्यानं पंतप्रधान मोदींना फटकारताना दिसत आहेत.

मोदींना पराभूत करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याचं आवाहनही राज यांनी जाहीर सभेत केलं होतं. त्यानंतर आता महाआघाडीची मोट बांधली जातेय. त्यात शरद पवार 'महागुरू'च्या भूमिकेत आहेत. ते आणि राज ठाकरे यांच्यातच ईशान्य मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील दिंडोरी या तीन मतदारसंघांबाबत बोलणी सुरू आहेत.

वास्तविक, राज ठाकरे यांनी मनसेच्या स्थापनेपासून आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवलं होतं. कुणाशीही युती किंवा आघाडी करणार नाही, हा शब्द त्यांनी आत्तापर्यंत पाळलाय. त्यांनी तटस्थ राहून किंवा वेगळ्या मार्गाने काही वेळा अन्य पक्षांना पाठिंबा दिला, पण मोठ्या निवडणुकांमध्ये थेट हातमिळवणी केली नाही. त्यामुळे यावेळी ते राष्ट्रवादीसोबत गेल्यास मनसेच्या स्वतंत्र अस्तित्वाला धक्का बसेल, एकेकाळी ज्यांच्यावर सडकून टीका केली त्यांनाच साथ दिल्याचा शिक्का बसेल, असा एक मतप्रवाह होता. परंतु, राष्ट्रवादीसोबत जाण्याचा राज ठाकरेंना फायदाच होईल, असं 'लोकमत'च्या जनमत चाचणीतून समोर आलं आहे.

'लोकमत'च्या वेबसाईटवर झालेल्या या चाचणीत ४ हजार वाचकांनी मतं नोंदवली. त्यापैकी २५६३ जणांनी राष्ट्रवादीसोबत गेल्यास मनसेची ताकद वाढेल, असं मत व्यक्त केलंय. तर, ही हातमिळवणी मनसेसाठी योग्य नाही असं १४३७ जणांना वाटतंय. त्याशिवाय, फेसबुकवरच्या ७२३ कॉमेंट्सपैकी बऱ्याच जणांनी या ठाकरे-पवार युतीला पाठिंबा दर्शवला आहे.

आता, मोदी सरकारच्या पाडाव करण्यासाठी मराठा + मराठी हे समीकरण जुळतं का, या राजकारणाचे काय पडसाद उमटतात आणि कुणाची पॉवर वाढते, हे हळूहळू समजेलच.