कोट्यवधी रुपयांची 'अमृत' योजना पाणीपुरवठ्यात कुचकामी का ठरली ? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 20:37 IST2025-10-31T20:36:29+5:302025-10-31T20:37:14+5:30

मुंबईत आढावा बैठक घेवून योजना सुरळीत करण्याचा शब्द : २४ तास पाणीपुरवठ्यासाठी असलेली योजना अजूनही रखडलेली असल्याने सहा दिवसाआड होतोय पाणीपुरवठा.

Why did the multi-crore 'Amrut' scheme prove ineffective in water supply? Deputy Chief Minister Ajit Pawar questions | कोट्यवधी रुपयांची 'अमृत' योजना पाणीपुरवठ्यात कुचकामी का ठरली ? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सवाल

Why did the multi-crore 'Amrut' scheme prove ineffective in water supply? Deputy Chief Minister Ajit Pawar questions

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
बेंबळा येथून यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी राबविलेल्या अमृत योजनेवर कोट्यवधींचा खर्च झाला आहे. सदर पैसा हा कुणाच्या घरचा नसून, जनतेचा आहे. त्यामुळे अमृत योजना फेल कशी पडली, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. पुणे, बारामती आणि पिंपरी चिंचवड येथील कामे बघा, असे सांगत कंत्राटदार योग्य काम करत आहे किंवा नाही, अधिकाऱ्यांचे कामावर लक्ष आहे का, याची खबरदारी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. अमृत योजनेच्या अपयशाबाबत मुंबई येथे आढावा बैठक घेतली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

समता मैदानात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, माजी सभापती अरुण राऊत, सतीश भोयर, दिनेश गोगरकर यांच्या नेतृत्वात आनंदराव जगताप, बाबू पाटील वानखडे, चंद्रशेखर चांदोरे, सृष्टी दिवटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार संजय खोडके, आमदार अमोल मिटकरी, आमदार मनोज कायंदे, जिल्हाध्यक्ष क्रांती कामारकर, चंद्रकांत ठाकरे, बाळासाहेब सोळसकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, अशोकराव घारफळकर, नानाभाऊ गाडबैले, क्रांती धोटे, अरुण राऊत, अमन भाई, लाला राऊत, विवेक देशमुख आदी उपस्थित होते. 

प्रवीण देशमुख यांनी प्रास्ताविकातून जिल्ह्यातील विविध समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. यवतमाळ शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी बेंबळा प्रकल्पावरून अमृत योजना राबविण्यात आली. मात्र शहरवासीयांना आजही दोन ते तीन दिवसाआड पाणी मिळते. अमृत योजना काही राजकीय लोकांच्या गडबडीने फेल गेल्याचेत म्हणाले.

अजित पवार यांनी संबोधित करताना सुरुवातीला अमृत योजनेवरून चांगलाच संताप व्यक्त केला. अमृत योजना १०० टक्के झाली असती तर सर्वांना पाणी मिळाले असते. शहर वाढीसाठी पाणी, रस्ते, वीज आणि इतर भौतिका सुविधा आवश्यक आहे. स्थानिक लोकांनी कामाचा दर्जा कसा आहे, हे बघायला पाहिजे. जबाबदार नागरिकांचे हे कर्तव्य आहे.

अमृत योजनेच्या अनुषंगाने मुंबई येथे बैठक घेवून त्यात नेमक्या काय अडचणी आहे, याचा आढावा घेऊन कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाचे संचालन कैलास राऊत यांनी तर आभार योगेश धानोरकर यांनी मानले.

जुन्या-नव्याचा वाद नको

आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे जुन्या-नव्याचा वाद न घालता निवडणुकीच्या तयारीला लागा. इलेक्टिव्ह मेरीटवर उमेदवार निवडताना तरुण चेहरे, महिला, अनुभवी पदाधिकारी यांना स्थान द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. पक्ष, संघटना चालविताना कार्यकर्ते जपले पाहिजे. पक्ष आणि संघटनेचा कणा हा कार्यकर्ताच आहे. त्यामुळे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी बोलताना तारतम्य ठेवावे. कुणाचा अपमान होणार नाही, याची काळजी घ्यावी. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आजोबा, वडिलांचा वारसा पुढे चालवावा. सर्व समाजाला सोबत घेऊन कार्य करावे, असे सांगितले.

शेती सिंचनासाठी हेड ते टेलपर्यंत पाणी देणार

बेंबळा प्रकल्पाच्या मेन लाईनला सिमेंट लायनिंग केली आहे. उपवितरिकेद्वारे शेवटच्या टेलपर्यंत पाणी गेले पाहिजे, यासाठी सिमेंट लायनिंग योग्य आहे की पाइपलाइन हे ठरवून शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले. समृद्धी महामार्गावर अॅग्रीकल्चर हब उभारण्याच्या दृष्टीने बैठक घेऊन यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल मुंबई, नागपूर येथे कसा जाईल, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. जिल्ह्यातील पाणंद रस्त्यासंबंधी पालकमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याशी चर्चा केली जाईल. जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यावर दुजाभाव होणार नाही, असे सांगितले. वृद्ध कलावंतांच्या मानधनाचा प्रश्नही सोडविला जाईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

Web Title : पानी की आपूर्ति में बहु-करोड़ 'अमृत' योजना क्यों विफल रही?

Web Summary : अजित पवार ने करोड़ों खर्च के बावजूद अमृत योजना की विफलता पर सवाल उठाया। उन्होंने सार्वजनिक धन जवाबदेही पर जोर दिया, अधिकारियों और प्रतिनिधियों से परियोजना की गुणवत्ता की निगरानी करने का आग्रह किया। उन्होंने योजना की कमियों को दूर करने के लिए मुंबई में एक समीक्षा बैठक का आश्वासन दिया और सिंचाई और किसान सहायता के लिए समाधान का वादा किया।

Web Title : Why did the multi-crore 'Amrut' scheme fail in water supply?

Web Summary : Ajit Pawar questioned the failure of the Amrut scheme despite crores spent. He emphasized public funds accountability, urging officials and representatives to oversee project quality. He assured a Mumbai review meeting to address the scheme's shortcomings and promised solutions for irrigation and farmer support.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.