हजारो हेक्टर पीक नष्ट होण्याच्या मार्गावर

By Admin | Updated: October 7, 2014 23:41 IST2014-10-07T23:41:12+5:302014-10-07T23:41:12+5:30

यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे. आता खरीप हंगामात सोयाबीनवर कपाशीपासून काही प्रमाणात शेतकऱ्यांना अपेक्षा होती.

On the way to the destruction of thousands of hectares of crop | हजारो हेक्टर पीक नष्ट होण्याच्या मार्गावर

हजारो हेक्टर पीक नष्ट होण्याच्या मार्गावर

यवतमाळ : यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे. आता खरीप हंगामात सोयाबीनवर कपाशीपासून काही प्रमाणात शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु आॅक्टोबरमधील प्रचंड गर्मी आणि पावसाने वेळेवर मारलेली दडी यामुळे सोयाबीन व कापूस ही जिल्ह्यातील मुख्य पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे.
एकीकडे शेतकऱ्यांची अतिशय वाईट अवस्था असताना शासनाचे अधिकारी कर्मचारी निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे सध्या कुणाचेही लक्ष नाही. यावर्षी सुरूवातीला काही प्रमाणात पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. त्यानंतर पावसाने लांबलचक दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणी संकट कोसळले. यातून शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होत कशाबशा पेरण्या आटोपल्या. त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु आता पुन्हा एकदा पावसाने दगा दिला. त्यातच वापश्याच्या महिन्यामुळे पिके करपायला लागली आहे. विविध किडींचा प्रादुर्भाव सोयाबीनवर, कापूस पिकांवर दिसून येत आहे.
अनेकांच्या शेतात जमिनीला भेगा पडल्या आहे. सिंचानाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी भारनियमनाचा सामना करीत कसीबसी आपली पिके वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनाही पूर्णपणे यश आलेले दिसत नाही.
जुन, जुलैमध्ये दडी मारलेल्या पावसाने खरीपातही वाताहत केली. आगस्टच्या मध्यात कोसळलेल्या पावसाने खरीप पिकांमध्ये काहीप्रमाणात सुधारणा दिसून आली होती. अनेकांच्या शेतात डोलणाऱ्या हिरव्यागार पिकांमुळे शेतकऱ्यांच्या आकांक्षांना पिकांबरोबरच पालवी फुटली होती. परंतु त्यानंतर पोळ््यापासून आतापर्यंत पावसाने त्यांची मोठी निराशा केली, त्यामुळे पिके करपून गेली.
आॅक्टोबरमध्ये वाढत्या तापमानामुळे शेतांना प्रचंड भेगा पडून खरीप पिकांची दयनीय अवस्था झाली आहे. सोयाबीन काढणीला येत असतानाच आता त्याची दाणी भरण्याची क्षमता मंदावली आहे. त्यामुळे सोयाबीनचे जिल्ह्यातील हजारो हेक्टेर पीक धोक्यात आले आहे. यामुळे शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: On the way to the destruction of thousands of hectares of crop