तस्करीत चोरीच्या वाहनांचा वापर

By Admin | Updated: September 11, 2014 23:51 IST2014-09-11T23:51:38+5:302014-09-11T23:51:38+5:30

यवतमाळ वनवृत्तातील जंगलांमधील परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल करून लाकूडसाठ्याच्या तस्करीची अनेक प्रकरणे गेल्या दोन महिन्यात पुढे आली. वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सारवासारवीचा केलेला

Use of smuggled stolen vehicles | तस्करीत चोरीच्या वाहनांचा वापर

तस्करीत चोरीच्या वाहनांचा वापर

यवतमाळ : यवतमाळ वनवृत्तातील जंगलांमधील परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल करून लाकूडसाठ्याच्या तस्करीची अनेक प्रकरणे गेल्या दोन महिन्यात पुढे आली. वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सारवासारवीचा केलेला प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला. चौकशीत तस्करीसाठी वापरलेली वाहने ही चोरीतील असून नांदेड या वाहनांचे मुख्य केंद्र असल्याचे निष्पन्न झाले. मात्र या चोरट्या वाहनांचा आणि सागवान तस्करीचा मुख्य सूत्रधाराचे गुन्हेगारी जगतात मोठे नाव आहे. त्यामुळे मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला असून सागवान तस्करीचा तपास पुढे सरकत नसल्याचे दिसून येत आहे.
हिवरी वनपरिक्षेत्रातील राखीव वनात दोनदा व घाटंजी वनपरिक्षेत्रातील साखरा राऊंड आणि त्या पाठोपाठ पुसद वनपरिक्षेत्रातील खंडाळा तर आता घाटंजी तालुक्यातील कोपरा येथील महसुली जमिनीवर सागवान वृक्षांची कत्तल आणि तस्करीचे प्रकरण उघडकीस आले. एकापाठोपाठ घडलेल्या या गंभीर घटनांची यवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांनी गंभीर दखल घेतली. त्यातूनच सारवासारव करणारे दोन वनपरिक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक, वनरक्षकांना निलंबित करण्यात आले. आता मात्र वनाधिकारी आणि कर्मचारी कारवाईच्या भीतीने खऱ्या अर्थाने सागवान तस्करांच्या शोधात लागले. संबंधित घटना उघडकीस आल्यानंतर आतापर्यंत घटनास्थळावरून तीन ट्रक जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान हे तिन्ही ट्रक चोरीतील असून त्यावर बनावट क्रमांक घातल्याचे निष्पन्न झाले.
चोरीतील या वाहनांची पाळेमुळे खणून काढताना चोरीतील ही वाहने सागवान तस्कर नांदेड येथून खरेदी करतात. विशेष असे की विक्रेता त्यांना बनावट क्रमांकाचे दस्तावेजही तयार करवून देतो. त्यामुळे ही वाहने बिनदिक्कत रस्त्यावरून धावतात. चोरीतील वाहने अल्प किमतीत मिळत असल्याने ती पकडली गेल्यास अथवा जप्त झाल्यास तस्करांना फारसा फरक पडत नाही. चोरीतील वाहने नांदेड येथून त्यातही कुणामार्फत खरेदी होतात याचे धागेदोरे वन विभागाच्या हाती लागले आहे. तसेच वाहन खरेदीदारच सागवान तस्करीचा मुख्य सूत्रधार असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. मात्र या सूत्रधाराचे नांदेड आणि मराठवाड्याच्या गुन्हेगारी जगतात मोठे नाव आहे. त्यामुळे त्याला अटक करावी कुणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Use of smuggled stolen vehicles