यवतमाळात जणू अनलॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:01 IST2020-07-25T05:00:00+5:302020-07-25T05:01:04+5:30

शुक्रवारी यवतमाळातील प्रमुख बाजारपेठच नव्हे तर गल्लीबोळातील दुकानांच्या समोरही खरेदीसाठी रांगा दिसून आल्या. दिवाळीला असणारी गर्दी शुक्रवारी यवतमाळकरांनी अनुभवली. खरेदीसाठी झालेली ही गर्दी पाहता लॉकडाऊन सात दिवसाचा जाहीर झाला की सात महिन्यांचा असा प्रश्न उपस्थित केला जात होता. किराणा, फळे किंवा भाजीपाला बाजारातच गर्दी होती असे नव्हे तर सर्वच प्रकारच्या दुकानांपुढे गर्दी दिसून आली.

Unlocked in Yavatmal | यवतमाळात जणू अनलॉक

यवतमाळात जणू अनलॉक

ठळक मुद्देसर्वत्र गर्दीच गर्दी : आजपासून सात दिवस लॉकडाऊन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शनिवार २५ जुलैपासून पुढील सात दिवस ३१ जुलैपर्यंत यवतमाळ शहरात संपूर्ण लॉकडाऊन आहे. परंतु त्याच्या तयारीसाठी शुक्रवारी यवतमाळात सर्वत्र जणू अनलॉकची स्थिती पहायला मिळाली. प्रत्येक रस्त्यावर गर्दी-गर्दी आणि गर्दी एवढेच काय ते चित्र दिसत होते.
शुक्रवारी यवतमाळातील प्रमुख बाजारपेठच नव्हे तर गल्लीबोळातील दुकानांच्या समोरही खरेदीसाठी रांगा दिसून आल्या. दिवाळीला असणारी गर्दी शुक्रवारी यवतमाळकरांनी अनुभवली. खरेदीसाठी झालेली ही गर्दी पाहता लॉकडाऊन सात दिवसाचा जाहीर झाला की सात महिन्यांचा असा प्रश्न उपस्थित केला जात होता. किराणा, फळे किंवा भाजीपाला बाजारातच गर्दी होती असे नव्हे तर सर्वच प्रकारच्या दुकानांपुढे गर्दी दिसून आली. बहुतांश मार्गांवर वाहतूक कोंडी झाली होती. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कोंडीचे कित्येकांनी आश्चर्य म्हणून फोटो-व्हीडीओही घेतले. आज गर्दीने बहरलेले रस्ते शनिवारपासून मात्र पुढील सात दिवस ओस पडणार आहे. या काळात फिरण्याची परवानगी नाही तरीही पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी पहायला मिळाली. कित्येकांनी दुचाकी वाहनांमध्ये चक्क ५०० ते ७०० रुपयांचे पेट्रोल भरुन घेतले.
पूर्णत: लॉकडाऊनमध्ये सकाळी दूध विक्री केंद्र तर सायंकाळी एक तास फिरुन दूध विकण्याला परवानगी राहणार आहे. भाजी, फळ विक्रेत्यांना नगर-कॉलण्यांमध्ये सकाळी विक्रीसाठी फिरता येणार आहे. दवाखाने, औषधी दुकानांना २४ तासांची परवानगी आहे. आता सात दिवस पोलीस रस्त्यावर दिसणार आहे.

पोलिसांचीही दाणादाण
सात दिवसांच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी यवतमाळ शहरात प्रचंड गर्दी उसळल्याने ती निवळताना पोलीस यंत्रणेचीही चांगलीच दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी पोलिसांचे वाहनच गर्दीत बराचवेळ फसून राहिल्याचाही अनुभव आला. अखेर शहर ठाणेदार धनंजय सायरे यांना स्वत: वाहतूक नियंत्रणासाठी रस्त्यावर उतरावे लागले.

Web Title: Unlocked in Yavatmal