आदिवासी विभागात चालक, वाहकाकडून कार्यालयीन कामे

By Admin | Updated: October 3, 2014 02:14 IST2014-10-03T02:14:45+5:302014-10-03T02:14:45+5:30

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक अंतर्गत अनेक कार्यालयात वाहक व चालकाकडून कार्यालयीन कामे करून घेतली जात आहे.

In the Tribal Department, the work of the driver, carrier by the driver | आदिवासी विभागात चालक, वाहकाकडून कार्यालयीन कामे

आदिवासी विभागात चालक, वाहकाकडून कार्यालयीन कामे

कळंब : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक अंतर्गत अनेक कार्यालयात वाहक व चालकाकडून कार्यालयीन कामे करून घेतली जात आहे. मंडळाच्या शासकीय गाड्या मोडकळीस आल्याने चालक व वाहकांना कार्यालयीन कामात जुंपण्यात आले. परिणामी शासकीय कामांचा खोळंबा सुरु झाला आहे.
कळंब येथे आदिवासी विभागाचे उपप्रादेशिक कार्यालय आहे. या कार्यालयातर्गंत कळंब, यवतमाळ, राळेगाव, बाभूळगाव, पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस, दारव्हा, नेर व आर्णी या तालुक्यांचा कारभार पाहला जातो. सुरवातीपासून या कार्यालयाला स्वत:चे चारचाकी वाहने उपलब्ध होती. या वाहनावर चालकासोबत वाहकाची नेमणूक करण्यात आली होती. या वाहनातून आश्रमशाळेमध्ये जाग्यावर धान्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात होता. तसेच खावटी वाटप करण्यासाठी याच वाहनातून धान्याची वाहतूक केली जात होती. स्वस्त धान्य दुकानातही माल पोहचविला जात होता. यासोबतच महामंडळामार्फत धान्य खरेदी करण्यात आल्यानंतर शेतमालाची आदिवासी विभागाच्या याच वाहनातून वाहतूक होत होती. परंतु दरम्यानच्या काळात या वाहनाचे कुठलेही मेंटनन्स न राखल्याने ही वाहने मोडकळीस आली. नवीन वाहने घेण्याचा प्रस्ताव अनेक वर्षापासून प्रलंबित होता. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. नुकतेच महाराष्ट्रासाठी ३२ वाहनांची खरेदी करण्यात आली. परंतु जिल्ह्यात मात्र केवळ एक वाहन उपलब्ध झाले. त्यातल्या त्यात तेही वाहन अनेक तांत्रिक कारणांमुळे जागेवरच उभे आहे.
पुर्वीसारखी या विभागाजवळ पर्याप्त वाहने नाही. त्यामुळे या वाहनावरील चालक व वाहकांची वीस वर्षांपेक्षा जास्त कालावधीची सेवा लक्षात घेता त्यांना कामावरून कमी न करता कार्यालयीन कामांमध्ये जुंपण्यात आले. हा प्रकार मागील चार-पाच वर्षांपासून सुरु आहे. आजच्या स्थितीत कळंब कार्यालयामध्ये वाहक व चालकांनाही कार्यालयीन कामात जुंपण्यात आले आहे. त्यांना कार्यालयीन कामाचा कुठलाही अनुभव नसल्यामुळे अनेकदा कामामध्ये व्यत्यय येतो. परंतु कार्यालयीन कामे वाहक व चालकांकडून करून घेतली जात असल्याने विहित मुदतीमध्ये विविध प्रकरणातील केसेस मंजुरीसाठी विलंब होत असल्याची ओरड लाभार्थ्यांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: In the Tribal Department, the work of the driver, carrier by the driver