महाविकास आघाडीच्या नेत्यांची ‘हिस्सेवाटणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 06:00 AM2020-03-18T06:00:00+5:302020-03-18T06:00:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : २६ मार्च रोजी होऊ घातलेल्या जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी ...

'Share' of development leaders | महाविकास आघाडीच्या नेत्यांची ‘हिस्सेवाटणी’

महाविकास आघाडीच्या नेत्यांची ‘हिस्सेवाटणी’

Next
ठळक मुद्देजिल्हा बँक संचालक मंडळ निवडणूक : जागा वाटपात आप्तस्वकीयांनाच खिरापत, कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : २६ मार्च रोजी होऊ घातलेल्या जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी जागांची ‘हिस्सेवाटणी’ करताना केवळ आप्तस्वकीयांचाच विचार केला. कार्यकर्त्यांना जागा वाटपातून कोसोदूर ठेऊन त्यांना केवळ सतरंजी उचलण्यापुरते रहावे, असाच संदेश या नेत्यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून दिला. त्यामुळे महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या सहकारातील सामान्य कार्यकर्त्यांमध्ये या नेत्यांप्रती तीव्र असंतोष पहायला मिळत आहे.
जिल्हा बँकेच्या २१ संचालक पदासाठी तब्बल १२ वर्षांनंतर २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे तीनही पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीत ही निवडणूक लढत आहेत. तालुका गटाच्या १६ आणि जिल्हा गटाच्या पाच असे हे जागांचे वाटप आहे.
तालुका गटाच्या दोन जागा काँग्रेस-राष्ट्रवादीकडे
तालुका गटाच्या १६ पैकी दोन जागांचे रोटेशन पद्धतीने आरक्षण काढण्यात आले. यावेळी महागाव तालुका गटाची जागा व्हीजेएनटीला तर आर्णीची जागा ओबीसीसाठी आरक्षित करण्यात आली. महाविकास आघाडीत महागावची जागा राष्टÑवादी काँग्रेसच्या वाट्याला आली असून प्रा. शिवाजी राठोड तेथून उमेदवार राहणार आहेत. आर्णीची जागा बँकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील यांच्यासाठी काँग्रेसने स्वत:कडे घेतली आहे.
जिल्हा गटातील पाच जागांच्या वाटपासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अनेक बैठका झाल्या. तीनही पक्ष प्रत्येकी दोन जागांवर अडून असल्याने बैठका निष्फळ ठरल्या. अखेर सोमवारी दारव्हा रोडवरील हॉटेलमध्ये अंतिम बैठक झाली. तेथे तीनही पक्षातील उपस्थित नेत्यांचा स्वार्थीपणा पुरता उघड झाला. प्रत्येक नेत्याने आपल्या आप्तस्वकीयांचेच नाव रेटण्यात कोणतीही कसर सोडली नाही. पालकमंत्री संजय राठोड यांना पाहिजे ती जागा सोडून द्या अशी भूमिका सुरुवातीलाच माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी मांडली. त्यानुसार ओपनची जागा सेनेला सोडण्यात आली.
मोघेंनी पुतण्यासाठी जागा खेचली
अ‍ॅड. मोघे यांनी आपले पुतणे संजय मोघे यांच्यासाठी एससी-एसटीच्या जागेवर दावा सांगून ती स्वत:कडे खेचून आणली. माणिकराव ठाकरे यांनी आपल्या पठडीतील अशोक बोबडे यांच्या पत्नीसाठी एक जागा सोडवून घेण्यात यश मिळविले. राष्ट्रवादी काँग्रेस वसंत घुईखेडकर आणि महागावातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य साहेबराव कदम यांच्या पत्नीला रिंगणात उतरविणार आहे. जिल्हा गटातील पाच पैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी दोन तर सेनेला एक जागा मिळाली आहे. या जागा वाटपात मोघे व नाईक या नेत्यांची सरशी झाल्याचे मानले जाते.
कार्यकर्त्यांचा पुन्हा घात झाला
जिल्हा गटातून बँकेची उमेदवारी मिळविण्यासाठी तीनही पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे अर्ज-विनंत्या केल्या होत्या. नेत्याने त्यांना अखेरपर्यंत भरोशावर ठेवले परंतु अखेरच्या क्षणी त्यांचा घात केला. या कार्यकर्त्यांना वाºयावर सोडून नेत्यांनी पुन्हा एकदा आपल्या आप्तस्वकीयांनाच संधी दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या नशिबी पुन्हा सतरंजीच उचलणे आले आहे. नेत्यांच्या या स्वार्थी वृत्तीचा कार्यकर्त्यांमधून तीव्र शब्दात निषेध होत आहे. सोशल मीडियावर तर या नेत्यांना शिव्यांची लाखोळी वाहिली जात आहे.
नेत्यांच्या नजरा नोकरभरतीवर
जिल्हा बँकेत नोकरभरतीच्या निमित्ताने लाखो रुपयांची ‘उलाढाल’ होते. या प्रक्रियेपूर्वीच अनेकांनी अ‍ॅडव्हॉन्स घेतले आहे. त्यामुळे बँकेत पुन्हा जाण्यासाठी धडपड सुरू आहे. या उलाढालीचे ‘वाटेकरी’ होण्यासाठीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या निकटवर्तीयांना बॅँकेच्या तिकिटांचे सोयीने वाटप केले. ही उलाढाल पक्ष कार्यकर्त्यांच्या हाती लागू नये याची खास खबरदारी या नेत्यांनी घेतल्याचे दिसून येते.

राहुल ठाकरेंसाठी शिवसेनेचा आधी होकार, नंतर अचानक नकाराने हिरमोड
माणिकराव ठाकरे यांनी पुत्र राहुल यांना दारव्हा तालुका गटातून बँकेच्या निवडणूक रिंगणात उतरविण्याचे निश्चित केले होते. त्यासाठी शिवसेनेची मदत मिळविण्याचेही ठरले होते. शिवसेना नेते ना. संजय राठोड यांनी त्यासाठी सुरुवातीला माणिकरावांना शब्दही दिला. त्यामुळे राहुल ठाकरे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे जोरदार तयारीलाही लागले होते. परंतु अचानक आठवडाभरातच ना. राठोड यांनी शब्द फिरविला. दारव्ह्याची जागा राहुलसाठी सोडण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली. त्यामुळे ठाकरे पिता-पुत्राचा हिरमोड झाला. तरीही बँकेत आपल्याला काही तरी ‘हिस्सा’ मिळावा म्हणून माणिकराव ठाकरे यांनी जिल्हा गटातील महिलेची जागा प्रतिष्ठेची करीत ती आपले निकटवर्तीय अशोक बोबडे यांच्या पत्नीसाठी खेचून आणली.

मोघे समर्थकाची शिवसेनेच्या दारातून एन्ट्री
सेनेकडून या जागेवर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजूदास जाधव यांना संधी देऊन ‘सामाजिक’ सलोखा राखला जाणार आहे. जाधव हे मुळात अ‍ॅड. मोघे यांचे उमेदवार मानले जातात. त्यांची एन्ट्री केवळ मोघेंच्याच सांगण्यावरून सेनेच्या दारातून होणार असल्याचे बोलले जाते. जाधव यांच्या नावाबाबत माजी मंत्री मनोहरराव नाईक, माणिकराव ठाकरे यांनीसुद्धा कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यांची जणू मूकसंमती होतीच.

‘हिस्सा’ मिळाल्याने नेते मूग गिळून
एकूणच जिल्हा बँकेच्या या जागा वाटपात महाविकास आघाडीतील नेत्यांच्या हिस्स्यावर काही ना काही आलेच आहे. त्यामुळेच एरव्ही जागा वाटपावरून माध्यमांकडे गळा काढणारे नेते यावेळी मूग गिळून आहेत. त्यांची ही चुप्पी वैयक्तिक स्वार्थापोटी असल्याचेही बोलले जाते. कार्यकर्त्यांना काहीच मिळाले नाही म्हणून या नेत्यांनी कधी गळे काढल्याचे मात्र ऐकिवात नाही.

निवडणुकीवर स्थगितीचे सावट
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २६ मार्च रोजी होऊ घातलेल्या संचालक मंडळ निवडणुकीवर कोरोनाच्या भीतीने स्थगितीचे सावट निर्माण झाले आहे.
कोरोनामुळे राज्यातील सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून होत असल्याने ती पुढे ढकलण्यास सहकार प्रशासनाने असमर्थता दर्शविली. अमरावतीचे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) राजेश दाभेराव यांनी या निवडणूक स्थगितीबाबत अद्याप कोणताही आदेश नसल्याचे सांगितले. दरम्यान कोरोनाच्या सावटात ही निवडणूक होत असल्याची बाब महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मंगळवारी निदर्शनास आणून देण्यात आली. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीच्या स्थगितीसाठी पुढाकार घेतल्याची माहिती आहे.
यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात शासनाकडून रितसर अर्ज करून कोरोना असतानाही जिल्हा बँकेची निवडणूक घेतली जात असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहे. ही निवडणुकसुद्धा पुढे ढकलण्याची विनंती शासनाकडून केली जाणार आहे. दोन दिवसात या संबंधीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर स्थगितीचे सावट पहायला मिळते.

Web Title: 'Share' of development leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.