ठाण्यात शिरले पावसाचे पाणी

By Admin | Updated: July 1, 2016 02:30 IST2016-07-01T02:30:48+5:302016-07-01T02:30:48+5:30

गुरुवारी सकाळी ६ ते ८ या दोन तासात कळंब परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. चक्रवती नदीला पहिल्यांदाच अनेक वर्षानंतर मोठा पूर आला.

Rain water entered in Thane | ठाण्यात शिरले पावसाचे पाणी

ठाण्यात शिरले पावसाचे पाणी

कळंब-दत्तापूर रस्ता जलमय : चक्रावती नदीला अनेक वर्षांनंतर आला पूर
कळंब : गुरुवारी सकाळी ६ ते ८ या दोन तासात कळंब परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. चक्रवती नदीला पहिल्यांदाच अनेक वर्षानंतर मोठा पूर आला. एवढेच नाही तर कळंब पोलीस ठाण्यासह इतर शासकीय व निमशासकीय संस्थेतही पाणी घुसले.
येथील पोलीस ठाण्यात तर गुडघाभर पावसाचे पाणी शिरले. यामध्ये काही कागदपत्रेही ओली झाली. एवढेच नाही तर पोलिसांना ठाण्यात प्रवेश करणेही कठीण झाले होते. तसेच तहसील कार्यालय, श्री चिंतामणी हायस्कुलही पावसाच्या पाण्याचे जलमय झाले होते. नदीच्या पुराचे पाणी काही घरात घुसले, परंतु कुठलीही हानी झाली नाही. दोन तास झालेल्या जबरदस्त पावसामुळे गावातील रस्तेही जलमय झाले होते त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. दत्तापूरचे रस्त्याचे अतिशय निकृष्ठ झाल्याचे या पावसामुळे स्पष्ट झाले.
येथील दत्तापूर रोडवर दुपदरी रस्त्याचे नुकतेच काम करण्यात आले. दोन्ही बाजुला प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले. परंतु पावसाचे पाणी जाण्यास कुठलीही परिणामकारक योजना आखण्यात आली नाही. त्यामुळे आज पहिल्याच पावसात रस्त्यावर दोन फुटांपर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक पुर्णत: बंद झाली होती. विशेष म्हणजे यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाागाकडे कामाच्या गुणवत्तेविषयी वारंवार तक्रारी करण्यात आल्या. परंतु कुठलीही दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे निकृष्ट झालेल्या या कामांंचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता बांधकाम विभागाने संबधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Rain water entered in Thane