Radium strip work on the state road, bypassing government standards | राज्य मार्गावरील रेडीयम पट्टीचे काम शासकीय मानकांना डावलून
राज्य मार्गावरील रेडीयम पट्टीचे काम शासकीय मानकांना डावलून

ठळक मुद्देतक्रारीची चौकशी । बांधकाम अभियंत्यांनी ‘आयव्हीआरसीएल’ला फटकारले

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : यवतमाळ-वणी ते घुग्घूस, पडोली या राज्य महामार्गावरील रस्ता दुभाजकाला रेडीयम पट्टी लावण्याचे काम ठरवून दिलेल्या मानकाला डावलून होत असल्याचे उघड झाले आहे. घुग्घूस येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने केलेल्या तक्रारीवर बांधकाम विभागाने चौकशी केली. त्यातून ही बाब उघड झाली. त्यानंतर बांधकाम विभागाने रस्त्याचे काम करणाऱ्या आयव्हीआरसीएल या कंपनीला चांगलेच फटकारले आहे.
घुग्घूस येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सिद्दीकी यांनी याविषयात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. रस्ता दुभाजकावर लावलेली झाडे अद्याप मोठी झाली नसल्याने रस्ता दुभाजकाच्या दोनही बाजूने झाडांची वाढ होईस्तोवर रेडीयम पेंट मारण्यात यावे, अशी त्यांनी मागणी केली होती. रस्ता दुभाजकावर झाडांची वाढ न झाल्याने रात्रीच्यावेळी दुतर्फा धावणाºया वाहनांच्या प्रकाशात वाहनचालकांचे डोळे दीपत आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणावर अपघात घडत असल्याचा दावा सिद्दीकी यांनी केला होता.
त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने आयव्हीआरसीएल कंपनीला पत्र देऊन यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यावर या कंपनीने काम प्रगतीपथावर असल्याचा दावा करत तसे सार्वजनिक बांधकाम विभागालाही कळविले होते. मात्र रेडीयम पट्टी लावण्याचे काम प्रगतीपथावर असताना कुठे १०० मीटरवर, तर कुठे २००, ३००, ५००, ७०० मीटरवर रेडीयम पट्ट्या लावल्या गेल्या. ही बाब लक्षात येताच सिद्दीकी यांनी पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत तक्रार केली. १६ जानेवारीला पांढरकवडा सार्वजनिक बांधकाम विभागात याविषयात बैठक पार पडली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयव्हीआरसीएल कंपनीचे चांगलेच कान टोचले. या कंपनीने अनेक कामे अर्धवट केल्याची बाब उघड झाली असून या विषयात आता २८ जानेवारीनंतर संयुक्त पाहणी करून चौकशी केली जाणार आहे. या बैठकीत रस्त्याच्या स्वच्छतेचाही विषय गाजला.

Web Title: Radium strip work on the state road, bypassing government standards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.