आचारसंहितेपूर्वीच वाढले प्रचार फंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 06:00 IST2019-09-06T06:00:00+5:302019-09-06T06:00:21+5:30

मतदार संघातील प्रत्येक तालुका मुख्यालय, गावखेड्यात बॅनर, पोस्टर्स आदींवर हे इच्छुक उमेदवार झळकत आहे. सणांच्या शुभेच्छांसह कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्याने मतदारांना उपकृत करण्याची एकही संधी सोडण्यास हे उमेदवार विसरत नाही.

Publicity funds raised before the Code of Conduct | आचारसंहितेपूर्वीच वाढले प्रचार फंडे

आचारसंहितेपूर्वीच वाढले प्रचार फंडे

ठळक मुद्देराळेगाव तालुका : अपवाद वगळता विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटनास फाटा

के.एस. वर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता आहे. ते पाहता, इच्छुक संभाव्य उमेदवारांकडून मतदारांना प्रभावित करण्यासाठी विविध तंत्राचा जोरदार वापर सुरू झाला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यापासून हा प्रकार सुरू असून आता शेवटच्या टप्प्यात कमालीची गती आली आहे.
मतदार संघातील प्रत्येक तालुका मुख्यालय, गावखेड्यात बॅनर, पोस्टर्स आदींवर हे इच्छुक उमेदवार झळकत आहे. सणांच्या शुभेच्छांसह कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्याने मतदारांना उपकृत करण्याची एकही संधी सोडण्यास हे उमेदवार विसरत नाही. मतदारांच्या वैयक्तीक सुख-दुखात सामिल होण्यासोबतच काय हवे नको याबाबतही आपुलकी दाखवून जवळीक साधण्याचा प्रयत्न होत आहे. पोळ्यात शेतकऱ्यांचा सन्मान होवू लागला आहे. तर शिक्षक दिनी शिक्षक पुरस्कृत होवू लागले आहे. गणपतीच्या शुभेच्छा बॅनरसह सोशल मीडियातून दिल्या जात आहे.
उद्घाटन व भूमिपूजनाच्या माध्यमातून परिसराच्या विकासाची दिशा कळू शकते. पण यावेळी प्रथमच एकाद दुसरा अपवाद वगळता महत्वाच्या राजकीय पक्षांनी याबाबींना फाटा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे मतदार संघात अनेक ज्वलंत प्रश्न कायम असताना विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही आवाज उठविला नाही. एकाही प्रकरणात गंभीरतेने जनआंदोलन केले नाही. याबाबतही मतदारात चर्चा सुरू आहे. एकीकडे मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विकास कामांची सर्वांनाच आस आहे. मात्र या बाबींकडे सत्ताधारी आणि विरोधक दुर्लक्ष करीत असून केवळ विविध फंडे वापरून प्रचार करीत आहेत.

मोबाईलवर येत आहे ढिगभर संदेश
गेल्या तीन-चार दिवसापासून या मतदार संघातील नागरिकांच्या मोबाईलवर टेप केलेल्या संदेशाचे प्रसारण सुरू झाले आहे. ‘आगामी विधानसभा निवडणुकीकरिता उमेदवारीच्या प्रयत्नात आहे. आपणाकडून सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा बाळगतो’ अशा आशयाचा संदेश फिरू लागला आहे. एका-एका मोबाईलवर हा संदेश दिवसातून अनेकदा धडकत आहे. त्यामुळे मतदारही त्रस्त होत आहे. आचारसंहिता लागल्यावर सोशल मीडियावर येणारी बंधने आणि प्रचार खर्चाचा द्यावा लागणार हिशेब यातून सुटण्यासाठी आतापासूनच प्रचाराचा हा फंडा वापरला जात आहे.

Web Title: Publicity funds raised before the Code of Conduct