वणीत दूध रस्त्यावर फेकून निषेध

By Admin | Updated: June 4, 2017 01:14 IST2017-06-04T01:14:57+5:302017-06-04T01:14:57+5:30

किसान क्रांती मोर्चाच्यावतीने राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी होत असून...

Prohibition of throwing on the road of Vanity milk | वणीत दूध रस्त्यावर फेकून निषेध

वणीत दूध रस्त्यावर फेकून निषेध

विविध मागण्या : शेतकऱ्यांचा संपाला पाठिंबा, भाजीपाल्याची आवक घटली
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : किसान क्रांती मोर्चाच्यावतीने राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी होत असून वणीतही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर फेकून शासनाचा तीव्र निषेध नोंदवित या संपाला जोरदार प्रतिसाद दिला.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यात यावी, शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतकऱ्यांना पेंशन योजना लागू करावी, दूधाला योग्य भाव मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी गुरूवारपासून राज्यातील शेतकरी एकसंघ होऊन संपांवर गेले आहेत. यात शेतकरी आपल्या भाजीपाला व दूध पुरवठा बंद करीत आहे. भाजीपाला व दूध रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध नोंदवित आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा या संपाला वाढता पाठींबा बघून शासनाचेही चांगलेच धाबे दणाणले आहे. शनिवारी सकाळी वणीतील गांधी चौकात असंख्य दूध उत्पादक एकत्रित आले. त्यांनी विक्रीसाठी आणलेले शेकडो लीटर दूध रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध नोंदविला.
या आंदोलनात शेतकरी संघटनेचे नेते देवराव धांडे, गुरुदेव सेनेचे मुख्य संयोजक दिलीप भोयर, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष मिलिंद पाटील, भाकपचे अनिल घाटे, दिलीप परचाके, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अजय धोबे, दशरथ पाटील, तेजराज बोढे, सुनिल मोहितकर, बालाजी काकडे, वामनराव मत्ते, अनंता मोहितकर, आनंद पानघाटे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते सदर संप यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे. या संपात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी होत आहे. वणी येथेही आजच्या आंदोलनादरम्यान, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजीपाल्याचे भाव वधारले
राज्यभर शेतकऱ्यांचा संप सुरू असून त्यामुळे वणीची बाजारपेठही प्रभावित झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून भाज्यांची आवक घटली असून दामदुपटीने भाज्यांची विक्री केली जात आहे. भाज्यांचे भाव गगणाला भिडल्याने गृहीणींचे बजेट पार विस्कळीत झाले आहे. वणीच्या भाजी बाजारात नागपूर, छिंदवाडा, संगमनेरसह वणी तालुक्यातूनही भाजीपाला येतो. मात्र बाहेर जिल्ह्यातून भाज्यांची आवक बंद झाली असल्याची माहिती वणी येथील भाज्यांचे ठोक विक्रेते राजेश महाकरकार यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Prohibition of throwing on the road of Vanity milk