नेर ‘आरोग्य’ची उडविली झोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 06:00 AM2019-11-13T06:00:00+5:302019-11-13T06:00:13+5:30
आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत माता व बाल संगोपनाचे कार्यक्रम राबविले जातात. पंधरवाडा, सप्ताह घेऊन आरोग्य विभागाच्या योजना सांगितल्या जातात. याचा केवळ गवगवा होतो. प्रत्यक्ष लोकांना किती चांगल्या सुविधा मिळतात, हा प्रश्नच आहे. गरोदर मातेस प्रसूतीपूर्व, प्रसूतीनंतर आरोग्य सुविधा पुरवावी लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : सुरक्षित मातृत्त्वासाठी प्रसूती रुग्णालयातच करा, असा आग्रह आरोग्य विभागाकडून धरला जातो. प्रत्यक्षात गर्भवतींना त्यादृष्टीने सुविधा मिळत नाही. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना रेफरचा आजार जडला आहे. गंभीर रुग्णांना तत्काळ दुसरीकडे पाठविले जाते. प्रसूतीच्या केसेसही टाळल्या जातात. अशावेळी शासनाच्या सुरक्षित प्रसूतीच्या केवळ वल्गना ठरत आहे. सोमवारी नेर येथे एका महिलेच्या रस्त्यावर झालेल्या प्रसूतीने याला बळ मिळाले आहे.
आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत माता व बाल संगोपनाचे कार्यक्रम राबविले जातात. पंधरवाडा, सप्ताह घेऊन आरोग्य विभागाच्या योजना सांगितल्या जातात. याचा केवळ गवगवा होतो. प्रत्यक्ष लोकांना किती चांगल्या सुविधा मिळतात, हा प्रश्नच आहे. गरोदर मातेस प्रसूतीपूर्व, प्रसूतीनंतर आरोग्य सुविधा पुरवावी लागते. अंगणवाडीच्या माध्यमातून या सेवा पुरविण्यात येतात. आरोग्य विभागाचे लाभ घेत असलेल्या महिलेची प्रसूती आरोग्य संस्थेत होणे बंधनकारक आहे. परंतू ग्रामीण आरोग्य सेवेचा सुरू असलेला गोंधळ पाहता नागरिक शहराची वाट धरतात.
ग्रामीण भागात नियमित तपासणी नाही
येलगुंडा येथील दुर्गा ज्ञानेश्वर हाके हिला प्रसूतीकळा सुरू झाल्याने नेर येथे एका खासगी रुग्णालयात आणले. गावातून नेरपर्यंत पोहोचण्यास उशीर झाल्याने तिला वेदना सुरू झाल्या. एका खासगी रुग्णालयात घेतले नसल्याने दुसऱ्या रुग्णालयाचा शोध पायदळ सुरू झाला. दरम्यान, दुर्गा हाके या ठेच लागून कोसळल्या. रस्त्यावरच तिची प्रसूती झाली. या घटनेने आरोग्य विभागाचे धिंडवडे निघाले आहे. दुर्गा हाके या महिलेला गावात नियमाप्रमाणे औषधोपचार, तपासण्या, सकस आहार मिळाला नसल्याची माहिती पुढे आली आहे. एकदाही तपासणी झाली नसल्याची माहिती मिळाली. आरोग्य विभागाचा हा सुस्तपणा जीवावर बेतण्याची भीती आहे.