पुणे, मुंबईतून आलेल्या तीन हजार नागरिकांवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 05:00 AM2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:01:08+5:30

पुणे आणि मुंबईतून आतापर्यंत ३ हजार नागरिक जिल्ह्यात परतले आहेत. हा आकडा १० हजारांच्या आसपास जाण्याचा अंदाज आहे. शिक्षण आणि नोकरीच्या शोधात गेलेले हे नागरिक गावात परतत आहेत. आता त्यांनी इतरत्र न फिरण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश पोलीस पाटलांना दिले आहेत. त्यांच्यावर २४ तास पाळत ठेवली जाणार आहे. त्यांच्यात कोरोनाचे लक्षण दिसले तर तत्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याच्या सूचना आहेत.

Look at the three thousand citizens from Pune, Mumbai | पुणे, मुंबईतून आलेल्या तीन हजार नागरिकांवर नजर

पुणे, मुंबईतून आलेल्या तीन हजार नागरिकांवर नजर

Next
ठळक मुद्देसंख्या दहा हजारांवर असण्याची शक्यता : ग्रामीण भागात शोध घेण्यासाठी दोन हजार पथकांची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पुणे, मुंबईत कोरोनाचा फैलाव वाढला आहे. या भागातून आता नागरिकांचे लोेंढे स्वगृही यवतमाळ जिल्ह्यात परतत आहेत. या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसण्याची दाट शक्यता आहे. यामुुळे परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी प्रशासनाला दिले आहे.
पुणे आणि मुंबईतून आतापर्यंत ३ हजार नागरिक जिल्ह्यात परतले आहेत. हा आकडा १० हजारांच्या आसपास जाण्याचा अंदाज आहे. शिक्षण आणि नोकरीच्या शोधात गेलेले हे नागरिक गावात परतत आहेत. आता त्यांनी इतरत्र न फिरण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश पोलीस पाटलांना दिले आहेत. त्यांच्यावर २४ तास पाळत ठेवली जाणार आहे. त्यांच्यात कोरोनाचे लक्षण दिसले तर तत्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याच्या सूचना आहेत.
त्या दृष्टीेने आरोग्य विभागाची यंत्रणाही सर्वेक्षणासाठी उतरली आहे. गावपातळीवर बाहेर ठिकाणावरून येणाºया नागरिकांची आकडेवारी गोळा केली जात आहे. आर्णीमध्ये दोन हजार ३३४ आणि महागाव तालुक्यात एक हजार ४४ नागरिकांची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. यातील काही नागरिकांची आरोग्य तपासणी झाली आहे.
आरोग्य विभागाने हाती घेतलेल्या सर्वेक्षणात आशा, अंगणवाडीताई, आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत. यासोबतच गावात कोण आले आणि त्यांच्या प्रकृती कशी आहे, यावर पोलीस पाटील पाळत ठेवणार आहे. त्याकरिता दोन हजार पथकांची निर्मिती केली आहे.
सर्वेक्षणादरम्यान कोरोनाशी संबंधित ‘ट्रॅव्हल हिस्ट्री’ आढळल्यास तशा व्यक्तींची माहिती तत्काळ तालुका यंत्रणेकडे पाठविली जात आहे. अशा व्यक्तीशी वैद्यकीय अधिकारी संपर्क करतात आणि त्यांची तपासणी करून गावातच क्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये तालुका स्तरावर आयसोलेशन वॉर्ड आणि फॅसिलेटेड क्वारंटाईन केंद्र तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी अशा व्यक्तींची व्यवस्था करण्यात येणार आहे. परदेशातून आले १६० नागरिक
जिल्ह्यात परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या १६० झाली आहे. आता विमानसेवाच ठप्प झाल्याने ही संख्या सध्याच वाढण्याची शक्यता नाही. या सर्वांना आरोग्य विभागाच्या यंत्रणेने क्वारंटाईन केले आहे. त्यांच्या हातावर शिक्का मारण्यात आला आहे. परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
क्वारंटाईन नागरिकांची संख्या १०५ वर
जिल्ह्यात क्वारंटाईन व्यक्तींची संख्या १०५ वर पोहचली आहे. आयसोलेशन वॉर्डातील ६ पैकी दोन व्यक्तींना आता सुटी देण्यात आली. तर आयसोलेशन वॉर्डात नव्याने दोन व्यक्ती समाविष्ट झाल्या आहेत. यामुळे आयसोलेशन वॉर्डातील व्यक्तींची संख्या पुन्हा सहावर पोहचली आहे. तीन पॉझिटिव्ह रूग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तर ६२ व्यक्तींना घरी सोडण्यात आले आहे.
४९ व्यक्तींवर फौजदारी कारवाई
संचारबंदीनंतरही गावात फिरणाऱ्या व्यक्ती आढळल्या. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्तची दुकाने उघडल्या गेलीत. काही ठिकाणी दारू आणि खर्रा विक्री करताना व्यावसायिक आढळले. अशा ४९ व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्यात आली.
संचारबंदी असूनही बाजारात गर्दी
अत्यावश्यक वस्तू आणण्याच्या नावाखाली नागरिकांनी बाजारात गर्दी केल्याचे चित्र मंगळवारी पहायला मिळाले. दुपारपर्यंत हे चित्र कायम होते. दुपारनंतर पोलिसांनी अशा नागरिकांना चोप देणे सुरू केले. त्यानंतर बाजारपेठेतील गर्दी कमी झाली.


प्रत्यक्ष दराच्या तीनपट अधिक एमआरपी
कोरोनाच्या दहशतीमुळे मास्क, सॅनिटायझर विक्री वाढली असून काही ठिकाणी त्यातही लूट सुरू आहे. अनेक ठिकाणी सॅनिटायझरच्या बॉटलवर १७५ रुपये एमआरपी नमूद आहे. प्रत्यक्षात ही बॉटल अवघ्या ५० रुपयात विकली गेली. यावरून किंमतीच्या दोन ते तीनपट अधिक एमआरपी मालावर नमूद केली जात असल्याचे स्पष्ट होते. हे सॅनिटायझर बनावट तर नाही ना अशी शंकाही व्यक्त केली जाऊ लागली आहे. अनेक ठिकाणी सॅनिटायझरचा साठा संपला आहे. ही कृत्रिम टंचाई निर्माण केली गेली असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

Web Title: Look at the three thousand citizens from Pune, Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.