दारव्हा येथे ऐतिहासिक ‘रिंगण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 05:00 AM2020-02-09T05:00:00+5:302020-02-09T05:00:11+5:30

मुंगसाजी माऊलींच्या रथाला तुतारीची सलामी दिल्यावर जेसीबीने पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या पालखी सोहळ्यात हरिपाठ मंडळ, भजनी मंडळ, रथावर अधिष्ठित माऊलींची प्रतिमा, बँड पथक, माऊलींचा रथ, विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, विविध झाँकी आदींचा समावेश होता.

Historic 'arena' in Darva | दारव्हा येथे ऐतिहासिक ‘रिंगण’

दारव्हा येथे ऐतिहासिक ‘रिंगण’

googlenewsNext
ठळक मुद्देडोळ्याचे पारणे फेडले । तुतारीने सलामी अन् जेसीबीने पुष्पवृष्टी

मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : येथील गोळीबार चौकातील गोल रिंगणस्थळी शनिवारी सकाळी ९ वाजता जय मुंगसाजी माऊली नामाचा जयघोष करीत माऊलींचा पालखी सोहळा पोहोचला. शेकडो भक्तासह अश्वांनी गोल रिंगण सोहळ्यात माऊलीच्या रथाला प्रदक्षिणा घातल्या. हा सोहळा याची डोळी पाहता यावा म्हणून भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
मुंगसाजी माऊलींच्या रथाला तुतारीची सलामी दिल्यावर जेसीबीने पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या पालखी सोहळ्यात हरिपाठ मंडळ, भजनी मंडळ, रथावर अधिष्ठित माऊलींची प्रतिमा, बँड पथक, माऊलींचा रथ, विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, विविध झाँकी आदींचा समावेश होता. यावेळी अनेक सामाजिक संघटना, विद्यार्थी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालखी सोबत असलेले लेझिम पथक, गोल रिंगण सोहळा, रांगोळी रेखाटन आदी कार्यक्रमांचे ड्रोण चित्रीकरण करण्यात आले. नंतर पालखीने धामणगावकडे मार्गक्रमण केले. पालखी मार्गावर माहुली, भुलाई, भांडेगाव, चिखली, मानकोपरा बोदेगाव, कोहळा येथे वारकऱ्यांना चहापाणी, नाश्ता, ऊसाच्या रसाची व्यवस्था माऊली भक्तांकडून करण्यात आली होती.
मानकोपरा येथील हनुमान मंदिर येथे माऊली भक्तांकडून दुपारचे अन्नदान करण्यात आले. शहरातील काही डॉक्टरांनी पालखी सोबत वैद्यकीय सेवा दिली. पालखी मुंगसाजी महाराजांच्या मुख्य दरबारात पोहोचल्यानंतर आरती करण्यात आली. शेवटी दरबारात झालेला दिव्यांचा दीपोत्सव सोहळा व फटाक्यांच्या आतषबाजीने डोळ्यांचे पारणे फेडले.
यानंतर पालखी यात्रेत सहभागी माऊली भक्तांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. माऊली भक्तांतर्फे विविध सेवा पदयात्रेमध्ये पुरविण्यात आल्या. रात्री मुंगसाजी माहुलीच्या दर्शनानंतर भाविकांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.


दारव्हा ते धामणगाव देव पालखी पदयात्रा
दारव्हा ते धामणगाव देव पालखी पदयात्रेचा शनिवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यानंतर मुंगसाजी महाराज संत मंदिर येथून पालखी पदयात्रेला प्रारंभ झाला. पालखी गोळीबार चौकातील गोल रिंगण सोहळ्यासाठी दाखल झाली. तेथे अश्वांनी गोल रिंगणाच्या सोहळ्यात माऊलींच्या रथाला प्रदक्षिणा घातल्या. मोठ्या गर्दीने या गोल रिंगणाचा सुखसोहळा डोळ्यात साठवून माऊलींच्या पालखी दर्शनाचा आनंद लुटला.

Web Title: Historic 'arena' in Darva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.