जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:01 IST2020-05-12T05:00:00+5:302020-05-12T05:01:25+5:30

वादळाचा तडाखा यवतमाळ, दारव्हा, नेर, कळंब, बाभूळगाव, घाटंजी, पुसद, केळापूर, राळेगाव, वणी आणि झरी तालुक्याला बसला. पुसद तालुक्यातील जांब शिवारात सर्वाधिक ३७ मिमी पावसाची नोंद झाली. वादळामुळे अनेकांच्या घरावरची टिनपत्रे उडून गेली. पोलीस चौक्यांचे नुकसान झाले. विजेचे खांब वाकले. ताराही तुटून पडल्या. यवतमाळ शहरातील अर्ध्या अधिक भागाचा वीज पुरवठा खंडीत झाला.

Heavy rains hit the district | जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा

जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा

ठळक मुद्दे५४ घरांची पडझड : दोन जखमी, वीज पडून बैल ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रविवारी सायंकाळी आलेल्या वादळाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यात ५४ घरांची पडझड झाली. वृक्ष कोसळून दोन जण जखमी झाले. तर वीज पडून एक बैल ठार झाला. आंबा, चिंच, कांदा, केळी आणि टरबुज पिकाचे नुकसान झाले. सरासरी ५.९० मिमी पावसाची नोंद हवामान खात्याने केली.
वादळाचा तडाखा यवतमाळ, दारव्हा, नेर, कळंब, बाभूळगाव, घाटंजी, पुसद, केळापूर, राळेगाव, वणी आणि झरी तालुक्याला बसला. पुसद तालुक्यातील जांब शिवारात सर्वाधिक ३७ मिमी पावसाची नोंद झाली. वादळामुळे अनेकांच्या घरावरची टिनपत्रे उडून गेली. पोलीस चौक्यांचे नुकसान झाले. विजेचे खांब वाकले. ताराही तुटून पडल्या. यवतमाळ शहरातील अर्ध्या अधिक भागाचा वीज पुरवठा खंडीत झाला.
यवतमाळात ७ घरांची पडझड झाली. कळंबमध्ये ५ घरांचे नुकसान झाले. घाटंजीत १ घर कोसळले. बाभूळगावात २३ घरे आणि ६ गोठ्यांचे नुकसान झाले. केळापुरात एका घराचे नुकसान झाले. झरी तालुक्यात १० घरे पडली. शेंबाळपिंप्रीमध्ये एका घराचे नुकसान झाले. कळंबमध्ये चार हेक्टर केळीच्या बागेचे नुकसान झाले. बाभूळगावमध्ये पपईच्या शेतीचे नुकसान झाले. कांदा, आंबा, फळपीक आणि भाजीपाला पिकांना फटका बसला. बाभूळगाव तालुक्यातील कोपरा जानकरमध्ये वृक्ष उन्मळून पडले. त्याखाली दोन व्यक्ती जखमी झाल्या. वणीत वीज कोसळून बैल ठार झाला.

यावर्षी पावसाळा वेळेवर
गतवर्षी २२ दिवस पाऊस उशिरा आला. मात्र यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने वेळेवर हजेरी लावली. यामुळे हवामान खात्याने पाऊस वेळेवर बरसण्याची शक्यता वर्तविली आहे.
वीज वितरण कंपनीचे सर्वेक्षण युद्धपातळीवर
दरवर्षी वीज वितरण कंपनीला वादळामुळे नुकसानीचा सामना करावा लागतो. रविवारच्या वादळाने पुन्हा नुकसान झाले. या नुकसानीचे सर्वेक्षण वीज कंपनीने युद्धपातळीवर सुरू केले आहे.

Web Title: Heavy rains hit the district

टॅग्स :Rainपाऊस