जिल्हा पोलीस अधीक्षकांनी श्रम संस्कार उक्तीपेक्षा कृतीत उतरविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 05:00 AM2021-02-11T05:00:00+5:302021-02-11T05:00:07+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षकांचा शासकीय बंगला अभय या नावाने ओळखला जातो. मुळात यवतमाळातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचा हा परिसर ब्रिटिश काळापासून ग्रीन हब म्हणून परिचित आहे. एसपींच्या बंगल्यात तीन गाई, दोन बैल, दोन बदके, ससे, कोंबड्या आणि आता दाखल झालेला एक कुत्रा आहे. विस्तीर्ण जागेत येथे पिके घेतली जातात. एम. राज कुमार यांच्या काळात येथे तुरीची लागवड झाली होती. त्यातून दोन पोते उत्पन्नही आले.

The district superintendent of police put the labor rites into practice | जिल्हा पोलीस अधीक्षकांनी श्रम संस्कार उक्तीपेक्षा कृतीत उतरविला

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी श्रम संस्कार उक्तीपेक्षा कृतीत उतरविला

Next
ठळक मुद्देशासकीय बंगल्यात पावणे चार एकर बागायती : गहू, भुईमुगासह भाज्यांची लागवड

सुरेंद्र राऊत 
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मातीशी नाळ जुळलेला माणूस तिच्यापासून दूर राहू शकत नाही. तो कुठल्याही पदावर असला तरी मातीचा स्पर्श सतत त्याला खुणावत असतो. शेतकरी कुटुंबात मिळालेले श्रमसंस्कार पोलीस खात्यात आल्यानंतर इतरांना सांगण्यासोबतच स्वत:च्या कृतीतही उतरविले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी आपल्या शासकीय बंगल्यात पावणे चार एकर बागायती केली आहे. तेथे विविध पिकांची लागवड केली.
जिल्हा पोलीस अधीक्षकांचा शासकीय बंगला अभय या नावाने ओळखला जातो. मुळात यवतमाळातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचा हा परिसर ब्रिटिश काळापासून ग्रीन हब म्हणून परिचित आहे. एसपींच्या बंगल्यात तीन गाई, दोन बैल, दोन बदके, ससे, कोंबड्या आणि आता दाखल झालेला एक कुत्रा आहे. विस्तीर्ण जागेत येथे पिके घेतली जातात. एम. राज कुमार यांच्या काळात येथे तुरीची लागवड झाली होती. त्यातून दोन पोते उत्पन्नही आले. विद्यमान एसपी डॉ. भुजबळ हे स्वत: शेतकरी कुटुंबातील असून, त्यांचे शिक्षणही बी.एससी. ॲग्री, एमएससी हार्टिकल्चर यामध्ये झाले आहे. बंगल्यातील जवळपास पावणे चार एकर जागा पाहून त्यांच्यातील शेतकरी जागा झाला. स्वत: सकाळी दोन तास ते या आपल्या शेतात श्रम करतात. त्यातून दिवसभराच्या कामाची ऊर्जा मिळत असल्याचे सांगतात. ज्याप्रमाणे योगा, प्राणायाम व इतर व्यायाम केला जातो. त्याहीपेक्षा अधिक आनंद गव्हाला पाणी देताना मिळतो, असे डॉ. भुजबळ सांगतात. सध्या त्यांनी २० गुंठ्यांत गहू लावला असून, त्याला सरीने पाणी दिले जाते. भुईमुगाची लागवड  केली आहे. जनावरांसाठी कडवळ (चारा) लावला आहे. येथे त्यांना चिकू, डाळिंब, पेरू, आंबा याची बाग तयार करायची आहे. विहिरीला पाणी असल्याने ते सहज शक्य असल्याचे एसपींनी सांगितले. याच परिसरात त्यांनी ३५० मीटरचा रनिंग ट्रॅक तयार केला आहे. आता ट्रॅकच्या बाजूनेसुद्धा फळझाडे लावणार आहे. एकंदरच नोकरीच्या काळात विविध ठिकाणी वास्तव्य असताना त्याच्या पाऊलखुणा वृक्षारोपणातून उमटल्याचे डाॅ.भुजबळ यांनी सांगितले. 

तुर्चीतील नक्षत्रवन बनले पर्यटन स्थळ 
 विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यातील तुर्ची येथील प्रशिक्षण केंद्राच्या बाजूला असलेला टेकडीवर तयार केलेले नक्षत्र वन त्या ठिकाणी ९९३ झाडांची लागवड केली. याशिवाय प्रशिक्षणार्थी १२५ फौजदारांनी तीन हजार मीटरचा रनिंग ट्रॅक श्रमसंस्कारातून उभा केला. या ठिकाणी ३०० कलमी आंब्यांची बाग तयार केली. एकूण सहा हजार वृक्ष लागवड परिसरात केली आहे. टेकडीवरच्या नक्षत्र वनाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. १९७२ च्या दुष्काळात ज्या महिलांनी त्या टेकडीवर चर खोदून मजुरी केली त्या वृद्ध महिलांनी  टेकडीचे बदललेले रूप पाहून थेट एसपींची भेट घेत कृतज्ञता व्यक्त केली. योगाचार्यांनाही या टेकडीवरच्या नक्षत्र वनाने भुरळ घातली आहे. याशिवाय बुलडाणा, भंडारा या ठिकाणच्याही शासकीय निवासस्थानी फळ झाडांची लागवड केली. दरवर्षी तेथून आंब्याच्या पेट्या मिळत असल्याचेही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले. त्यांनी आपल्या श्रमसंस्कारातून एक नवा आदर्श सर्वांसाठीच उभा केला आहे.

 

Web Title: The district superintendent of police put the labor rites into practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.