दहेगाव आरोग्य केंद्राची दैना

By Admin | Updated: October 5, 2015 02:36 IST2015-10-05T02:36:17+5:302015-10-05T02:36:17+5:30

राळेगाव तालुक्याच्या दहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची दैना वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी प्रत्यक्ष अनुभवली.

The Dahgaon Health Center | दहेगाव आरोग्य केंद्राची दैना

दहेगाव आरोग्य केंद्राची दैना


किन्ही(जवादे) : राळेगाव तालुक्याच्या दहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची दैना वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी प्रत्यक्ष अनुभवली. शनिवारी त्यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील प्रश्न जाणून घेतले. यावेळी नागरिकांनी सदर आरोग्य केंद्राच्या कारभाराविषयी तक्रारीचा पाढा वाचला.
सुरुवातीला किशोर तिवारी यांनी या आरोग्य केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानांची पाहणी केली. पाहणी सुरू असतानाच गावकरी या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी सदर आरोग्य केंद्रात अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध होत नाही, केवळ तीन ते चार तास अधिकारी सेवा बजावतात, कर्मचाऱ्यांची रुग्णांसोबतची वागणूक अरेरावीची असते आदी प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या.
सिकलसेलच्या रुग्णांसाठी असलेली फोलिक अ‍ॅसीड ही औषधी या आरोग्य केंद्रामध्ये मागील तीन महिन्यांपासून उपलब्ध नाही. ही गंभीर बाब यावेळी मांडण्यात आली. अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्याने रुग्णांना अपवादानेच दाखल करून घेतले जाते. ‘रेफर’चा आजारच या आरोग्य केंद्राला झाला आहे. शिवाय कर्मचाऱ्यांचा तुटवडा ही बाबही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आली. औषधी वितरक नाही त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याकडून ही जबाबदारी पूर्ण करून घेतली जाते. दहेगावचे सरपंच शेषराव ताजने, विनोद मेश्राम, प्रवीण लोडे आदींनी या आरोग्य केंद्राच्या समस्या मांडल्या. (वार्ताहर)

Web Title: The Dahgaon Health Center