Crop conditions are better than writing revenue! | पीक परिस्थिती महसूलच्या लेखी उत्तम!

पीक परिस्थिती महसूलच्या लेखी उत्तम!

ठळक मुद्देनजर पैसेवारी : जिल्हाभरातील शेतकऱ्यांमध्ये संताप, सारेच हैराण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यावर्षी प्रारंभापासून जिल्ह्यातील पीक परिस्थिती चिंताजनक आहे. पीक हातात येण्याच्या काळात पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. यानंतरही महसूल विभागाने जाहीर केलेली नजर पैसेवारी मात्र उत्तम निघाली. जिल्ह्यातील २०४५ गावांची पीक पैसेवारी ६५ टक्के जाहीर करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी बुचकळ्यात पडले आहेत.
जूनमध्ये पावसाला प्रारंभ झाला. मध्यंतरी पावसाने ओढ दिली. मधात पीक चांगली होते. पण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने जोर पकडला. झडी स्वरूपातील पावसाने शेत शिवार उद्ध्वस्त केले. शासनाची यंत्रणा या नुकसानीचे सर्व्हेक्षण करीत आहे. शेतकऱ्यांना आपल्या घरात मूग आणि उडीद आणता आला नाही. सोयाबीनला कोंब फुटल्याने सोयाबीनमध्ये बि उरले नाही. कापूस ओला झाला. मोठ्या प्रमाणात पातीगळ झाली. ज्वारी सडत आहे. तिळ सडत आहे. तूर वाळत आहे. अशा चिंताजनक परिस्थितीत महसूल प्रशासनाने पीक पैसेवारी जाहीर केली.
सर्वांच्या डोळ्यांसमक्ष पीक उद्ध्वस्त होताना शेतकरी पाहत आहे. मग अशा स्थितीत महसूल विभागाच्या यंत्रणेनेने पीक उत्तम असल्याचा निर्वाळा कसा दिला, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे नैसर्गिक संकटाची मालिका शेतकऱ्यांना त्रासून सोडत असताना प्रशासन मात्र कागदावर रेघोट्या मारून त्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याची टीका जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह जाणकार व्यक्त करीत आहे.

अहवाल वस्तुस्थितीला धरून नाही
पिकांच्या स्थितीचे तीन अहवाल सादर होतात. त्यातला पहिला नजर पैसेवारीचा अहवाल आला आहे. यात जिल्ह्याची पीक परिस्थिती ६५ टक्के आहे. ५० टक्क्याच्या वर पैसेवारी येणे म्हणजे पीक स्थिती उत्तम, असा निष्कर्ष काढला जातो. हा अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.

अशी आहे पीक पैसेवारी
यवतमाळ ६५ टक्के, कळंब ६७, बाभूळगाव ६८, आर्णी ६२, दारव्हा ६४, दिग्रस ६५, नेर ६३, पुदस ६५, उमरखेड ६७, महागाव ६२, केळापूर ६४, घाटंजी ६५, राळेगाव ६६, वणी ६७, मारेगाव ६५ तर झरीची पैसेवारी ६३ टक्के जाहीर करण्यात आली आहे.

Web Title: Crop conditions are better than writing revenue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.