काँग्रेसची कार्यकारिणी प्रदेश कार्यालयात पडून

By Admin | Updated: September 20, 2014 01:46 IST2014-09-20T01:46:44+5:302014-09-20T01:46:44+5:30

जिल्हा काँग्रेस कमिटीची नवी कार्यकारिणी गेल्या

Congress Working Committee | काँग्रेसची कार्यकारिणी प्रदेश कार्यालयात पडून

काँग्रेसची कार्यकारिणी प्रदेश कार्यालयात पडून

महिनाभरापासून प्रतीक्षा : जिल्हाभरातील कार्यकर्ते अस्वस्थ
यवतमाळ :
जिल्हा काँग्रेस कमिटीची नवी कार्यकारिणी गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन मुंबई कार्यालयात पडून आहे. मात्र प्रदेशाध्यक्षांना या कार्यकारिणीला मंजुरी देण्यासाठी सवड मिळालेली नाही. इकडे विधानसभा निवडणुकीचे नामांकन दाखल करण्याचा दिवस उजाडूनही पक्षाची कार्यकारिणीच अस्तित्वात नसल्याने जिल्हाभरातील इच्छुक काँग्रेस कार्यकर्ते अस्वस्थ झालेले पहायला मिळत आहे.
१६ जून दरम्यान आमदार वामनराव कासावार यांनी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बरखास्त केली. तेव्हापासून नव्या कार्यकारिणीची कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे. कासावार यांनी संपूर्ण जिल्ह्याचा समतोल राखत नवी जम्बो कार्यकारिणी तयार केली. आॅगस्टमध्येच ही कार्यकारिणी मंजुरीसाठी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आली. मात्र अद्याप त्याला मंजुरी दिली गेली नाही. असंतुष्टांना एन्ट्री द्यावी की नाही हा सदर कार्यकारिणी रखडण्यामागील मुख्य मुद्दा सांगितला जातो. जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांविरुद्ध बंड पुकारणाऱ्या आणि पक्षाची शिस्त मोडणाऱ्या दुसऱ्या फळीतील अनेक नेत्यांना या कार्यकारिणीतून बाद करण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांनी घेतला. परंतु या बंडखोरांना पुन्हा कार्यकारिणीमध्ये घ्यावे म्हणून प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांचा आग्रह आहे. याच कारणावरून जिल्ह्यातील काँग्रेस नेते विरुद्ध प्रदेशाध्यक्ष असा वाद पक्षस्तरावर रंगतो आहे. विधानसभा निवडणूक जारी होऊनही काँग्रेसची कार्यकारिणीच अस्तित्वात नसल्याने निवडणुकांना सामोरे जायचे कसे असा प्रश्न जिल्हाध्यक्षांसह नेत्यांना पडला आहे. जिल्ह्यातील सात पैकी सहा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत. केवळ पुसदचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. संपूर्ण जिल्ह्यातच काँग्रेसचे उमेदवार रिंगणात उतरणार असताना पक्षाची कार्यकारिणीच नसल्याने कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे. याबाबीला जबाबदार कोण असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जात आहे. जिल्ह्यातील नेत्यांनी थेट प्रदेश कार्यालयाकडे बोट दाखविल्याने कार्यकर्त्यांमध्ये माणिकरावांप्रती रोष पहायला मिळत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
काँग्रेसची नवी जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. ती मंजुरीसाठी गेल्या महिन्यातच प्रदेश काँग्रेस कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. या यादीला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. ही मंजुरी लवकरच मिळेल अशी आशा आहे.
- वामनराव कासावार
आमदार तथा जिल्हाध्यक्ष
काँग्रेस कमिटी, यवतमाळ.

Web Title: Congress Working Committee