बंद पडलेल्या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांची वाताहत

By Admin | Updated: September 3, 2014 00:05 IST2014-09-03T00:05:42+5:302014-09-03T00:05:42+5:30

तालुक्यातील बंद पडलेल्या एका आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांची पुरती वाताहत होत आहे. समायोजनाच्या नावाखाली केवळ त्यांची बोळवण केली जात असून एका शासकीय आश्रमशाळेवर नियुक्ती देण्यात आली.

Cavalcade workers of the closed Ashram school | बंद पडलेल्या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांची वाताहत

बंद पडलेल्या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांची वाताहत

पुसद : तालुक्यातील बंद पडलेल्या एका आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांची पुरती वाताहत होत आहे. समायोजनाच्या नावाखाली केवळ त्यांची बोळवण केली जात असून एका शासकीय आश्रमशाळेवर नियुक्ती देण्यात आली. मात्र तेथेही अतिरिक्त ठरविण्यात आले. आता या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून शिक्षक दिनापासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
पुसद तालुक्यातील धुंदी येथे बद्दूसिंग आडे विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळा आहे. ही आश्रमशाळा महाराष्ट्र शासनाच्या विमाप्र कल्याण संचालनालयाकडून बंद करण्यात आली. तेथील सर्व कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या व्यवस्थेंतर्गत अनुसूचित जाती शासकीय निवासी शाळेवर नियुक्ती दिली. मात्र तेथेही त्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे समायोजन झाले नाही. समायोजन व्हावे म्हणून उच्च न्यायालयात दाद मागितली. तत्कालीन समाज कल्याण अधिकाऱ्यांनी तुम्ही न्यायालयात दाद का मागितली म्हणून संबंधित कर्मचाऱ्यांना शासकीय निवासी शाळेतून १४ फेब्रुवारी २०१४ रोजी कार्यमुक्त केले.
बंद शाळेच्या आस्थापनेपासून जानेवारी २०१४ पर्यंतचे सर्व कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले. मात्र या कर्मचाऱ्यांना शैक्षणिक कार्यापासून कार्यमुक्त केले. त्यामुळे फेब्रुवारीपासून त्यांना वेतनच मिळाले नाही.
सहायक आयुक्तांनी १ मार्च रोजी या कर्मचाऱ्यांना आश्रमशाळा मोहा, कोपरा, वडगाव, माळहिवरा, महाळुंगी येथे रुजू होण्याचे आदेश दिले. परंतु तेथील शालेय व्यवस्थापनाने जागा उपलब्ध नसल्याचे कारण सांगून आयुक्तांचा आदेश धुडकावला. एकीकडे कार्यमुक्त करून दुसरीकडे जागा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी रुजू करण्याचा आदेश म्हणजे सूडबुद्धीने केलेली कारवाई होय, असा आरोप कर्मचारी करीत आहे. या सर्व प्रकारामुळे सदर कर्मचारी मात्र अडचणीत आले आहे. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत त्यांनी सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री आणि अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले. या प्रकरणात न्याय न मिळाल्यास ५ सप्टेंबर शिक्षक दिनी सहकुटुंब उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. (वार्ताहर)

Web Title: Cavalcade workers of the closed Ashram school