बोदेगाव साखर कारखाना २२२ कोटींच्या कर्जासाठी काढला विक्रीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 05:00 AM2021-03-06T05:00:00+5:302021-03-05T23:30:02+5:30

दारव्हासह यवतमाळ व वाशीम जिल्ह्यातील सहा तालुके कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व उद्योग धंद्याला चालना मिळाली होती. परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे २००९ पासून गाळप हंगाम बंद करावा लागला. त्यामुळे कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. २२२ कोटींचे कर्ज थकल्याने वसुलीसाठी आता कारखाना विक्रीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. 

Bodegaon sugar factory sold for loan of Rs 222 crore | बोदेगाव साखर कारखाना २२२ कोटींच्या कर्जासाठी काढला विक्रीला

बोदेगाव साखर कारखाना २२२ कोटींच्या कर्जासाठी काढला विक्रीला

Next
ठळक मुद्देकर्ज वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेचा निर्णय, दारव्हासह सहा तालुके बाधित

मुकेश इंगोले
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : तालुक्यातील बोदेगाव येथील जयकिसान सहकारी साखर कारखाना विक्रीला काढण्यात आला आहे. राज्य बँकेने यासंदर्भात निविदा मागविल्या असून विक्रीनंतर कारखान्याचे भवितव्य काय, याबाबत या सहा तालुक्यात चिंता व्यक्त केली जात आहे.
दारव्हासह यवतमाळ व वाशीम जिल्ह्यातील सहा तालुके कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व उद्योग धंद्याला चालना मिळाली होती. परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे २००९ पासून गाळप हंगाम बंद करावा लागला. त्यामुळे कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. २२२ कोटींचे कर्ज थकल्याने वसुलीसाठी आता कारखाना विक्रीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. 
विकासाचा दृृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून साखर कारखान्याची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी बोदेगाव हे मध्यवर्ती ठिकाण ठरवून १६ मे १९८९ रोजी जयकिसानची नोंदणी करण्यात आली. यवतमाळमधील दारव्हा, नेर व दिग्रस, तर वाशीम जिल्ह्यातील कारंजा, मानोरा व मंगरूळ हे तालुके कार्यक्षेत्र ठरवून या भागात आठ हजार ८३० सभासद करण्यात आले. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर प्रती दिवस अडीच हजार टन गाळप क्षमतेच्या कारखाना अस्तित्वात आला. १९९२ ला चाचणी हंगामात १५५० मेट्रिक टन गाळप झाले. १९९३ ला ४५ हजार ७६५ मेट्रिक टन गाळप झाले. १९९७ व १९९९ हे दोन वर्ष गाळप बंद होते. हे वर्ष सोडले तर दहा वर्षात एकुण नऊ लाख ८६ हजार ७११ मेट्रिक टन इतके गाळप झाले. 
नंतर दुष्काळी परिस्थितीमुळे २००४ साली कारखाना बंद पडला. गाळप क्षमतेइतका ऊस उपलब्ध झाला नाही. ऊस वाहतुकीच्या खर्चात वाढ झाली. साखर उताऱ्यात घट, क्षमतेइतके गाळप न झाल्याने दीर्घ, मध्यम मुदती कर्जाच्या मुद्दलाचे हप्ते वेळेवर न भरता आल्याने व्याजाच्या बोजात वाढ झाली. कर्जाचा भरणा वेळेत न झाल्याने मोठ्या प्रमाणात कर्ज थकले. त्यामुळे २००६ मध्ये कारखाना अवसायनात गेला. त्यानंतर कारखाना बंद पडून नुकसान होऊ नये म्हणून तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याला २००६ ते २०१२ या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यात आला. त्यांनी तीन हंगामात यशस्वी गाळप केले. परंतु २००८ ते २०१० या वर्षात दुष्काळजन्य परिस्थितीमुळे गाळप हंगाम न घेता उभयपक्षी झालेला करार एकतर्फी संपुष्टात आला. त्यामुळे २००९ पासून कारखाना बंद पडला.
कारखाना पुन्हा सुरू होण्यासाठी ऊस शेतकरी आग्रही
मोठा गाजावाजा करून शरद पवार यांच्या हस्ते या कारखान्याचे उद्घाटन झाले होते. अडाण, अरूणावती यासह अनेक प्रकल्पामुळे या परिसरात सिंचनाची सुविधा आहे. ऊस लागवडीसाठी कारखान्याकडून प्रयत्न करून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. या परिसरात अनेकांना नोकरी व इतर रोजगार मिळाला. अनेक उद्योग, व्यवसायाला चालना मिळाली होती. परिसराचा कायापालट होत असताना कारखाना बंद पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या अटीवरच विकला जावा, अशी मागणी होत आहे.

 

Web Title: Bodegaon sugar factory sold for loan of Rs 222 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.