'तु आम्हाला शिकवतो का?' पोलिस असल्याचा बनाव करून तिघांनी एका तरूणाला केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 14:59 IST2026-01-15T14:58:06+5:302026-01-15T14:59:02+5:30

Yavatmal : वडिलांना धमकी देत रक्कम उकळली, वनोजादेवी बसस्थांब्यावरील घटना

'Are you teaching us?' Three men pretending to be policemen beat up a young man | 'तु आम्हाला शिकवतो का?' पोलिस असल्याचा बनाव करून तिघांनी एका तरूणाला केली मारहाण

'Are you teaching us?' Three men pretending to be policemen beat up a young man

संतोष कुंडकर
वणी (यवतमाळ) :
एलसीबीचे पोलिस कर्मचारी असल्याची बतावणी करत तिघा तरूणांनी एकाला मारहाण केली. नंतर त्या तरूणाच्या लाखापूर येथील घरी जाऊन त्याच्या वडिलांनाही धमकावत दीड हजार रूपयांची रक्कम उकळली. ही थरारक घटना बुधवारी सायंकाळी मारेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वनोजादेवी बसथांब्यावर घडली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, मारेगाव पोलिसांनी पाठलाग करत तिनही तोतया पोलिसांच्या मुसक्या आवळल्या. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे. हर्षल रामेश्वर ठाकरे (३८) रा.आर्वी नाका, वर्धा, हरिष कैलासराव ठाकरे (३४) रा.रामनगर, वर्धा व अनंता अजाबराव धोटे (३९) रा.तिरझडा, ता.कळंब (जि.यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींजवळून एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. लाखापूर येथील रहिवासी मंगेश दिलीप मेश्राम (३०) हा बुधवारी सायंकाळी काही मित्रांसमवेत वर्धा नदीवर आंघोळ करून वनोजादेवी येथील बसथांब्यावर चहा पिण्यासाठी थांबला होता. 

याचदरम्यान त्याठिकाणी एम.एच.३२-ए.एक्स.६२५४ क्रमांकाची कार पोहोचली. या कारमधून तिघेजण खाली उतरले व चहा टपरीसमोर ठेवलेल्या खूर्चीवर लांब पाय करून बसले. यावेळी मंगेशने त्यांना खुर्चीवर सरळ बसा, इतर लोकांना पण बसता आले पाहिजे, असे म्हटल्यानंतर त्या तिनही तरूणांनी आम्ही एलसीबीचे पोलिस कर्मचारी आहोत, तु आम्हाला शिकवतो का, असे म्हणत मंगेशला मारहाण सुरू केली. त्यामुळे त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करत मंगेश पळतपळत लाखापूर येथे पोहोचला. ते तोतया पोलिस एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी गावापर्यंत मंगेशचा पाठलाग केला. नंतर ते मंगेशच्या घरीही पोहोचले. यावेळी घरी उपस्थित असलेल्या मंगेशच्या वडिलांना या तिघांनी आम्ही पोलिस आहोत, तुमच्या मुलावर कारवाई करतो, अन्यथा पैसे देऊन सेटलमेंट करा, अशी दमदाटी केली.

त्यामुळे मंगेशच्या वडिलांनी घाबरून जाऊन स्वत:जवळ असलेले एक हजार ५०० रूपये या आरोपींच्या हवाली केले. त्यानंतर हे तिघेहीजण कारने तेथून पळून गेले. दरम्यान, याप्रकरणी मंगेशने मारेगाव पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरूद्ध बीएनएसच्या कलम ३०४, ३१८, ११५ (२), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हे दाखल केले. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दिगंबर किनाके, शिपाई सागर दीपेवार करित आहेत.

पाठलाग करून मुसक्या आवळल्या

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. घटनेनंतर हे आरोपी वनोजादेवी येथून वणीकडे पळून आल्याची गोपनिय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक वणीत पोहोचले. येथील साई मंदिर चौकात आरोपींचा शोध घेण्यात आला. मात्र याचवेळी आरोपींचे वाहन साई मंदिर चौकातून मारेगावकडे निघाले. ही बाब लक्षात येताच, पोलिस पथकाने त्यांचा पाठलाग सुरू केला. दुसरीकडे मारेगावच्या मार्डी चौकात पोलिसांनी नाकाबंदी लावली. आरोपीचे वाहन मार्डी चौकात पोहोचताच, आरोपींचे वाहन अडवून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तसेच वाहनदेखिल जप्त करण्यात आले.

Web Title: 'Are you teaching us?' Three men pretending to be policemen beat up a young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.