विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By Admin | Updated: May 28, 2015 02:01 IST2015-05-28T02:01:03+5:302015-05-28T02:01:03+5:30

बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय रद्द करावा, डॉ.नरेंद्र दाभोळकर व कॉ.गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी, ...

Appeal to the Chief Minister of various demands | विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वणी : बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय रद्द करावा, डॉ.नरेंद्र दाभोळकर व कॉ.गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी मराठा सेवा संघ व जगतगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे निवेदनातून केली आहे.
महाराष्ट्र सरकारने बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला. या निर्णयाचा मराठा सेवा संघाने निषेध नोंदविला. पुरंदरे यांनी आपल्या लेखणातून सातत्याने धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या बाबी जाणीवपूर्वक मांडल्या, असा त्यांचा आरोप आहे. शहाजी महाराज, जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांच्या बाबतीत विकृत लेखन करून त्यांचा पुरंदरे यांनी अपमान केल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला. पुरंदरे यांनी आपल्या लिखाणातून महिलांबाबत अत्यंत हिणकस व असभ्य भाषा वापरल्याचा आरोपही मराठा सेवा संघाने केला. त्यामुळे त्यांना घोषित केलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार रद्द करावा, तसेच शिवचरित्रात विकृती घुसडणाऱ्या त्यांच्या सर्व साहित्याची समीक्षा करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. महाराष्ट्राचे खरे भूषण ठरलेले आणि जनसामान्यांना आपल्या विचारातून आणि साहित्यातून सत्य सांगणारे पुरोगामी चळवळीतील दिवंगत गोविंद पानसरे व डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचे मारेकरी अद्याप मोकाट आहे. सरकारसाठी ही अत्यंत अत्यंत अपमानास्पद बाब असून शासनाच्या कारभारावर शंका निर्माण करणारी आहे. या बाबी ध्यानात घेता पोलीस यंत्रणेने या दोन्ही हत्येमागील मारेकऱ्यांना आणि सुत्रधारांना त्वरित अटक करावी, अशी मागणीही मराठा सेवा संघ व जगतगुरू तुकोबारा साहित्य परिषदेने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून केली. (प्रतिनिधी)

Web Title: Appeal to the Chief Minister of various demands