यवतमाळ : एरवी संपूर्ण वर्षभरात अवघे १२ ते १५ ट्रॅप यशस्वी करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची (एसीबी) कामगिरी यावर्षी चांगलीच उंचावली आहे. अवघ्या आठ-नऊ महिन्यातच एसीबीच्या ट्रॅपची संख्या दोन डझनांवर पोहोचली आहे. महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या नेतृत्त्वात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा महाराष्ट्रभर धुमधडाका सुरू आहे. दरदिवशी कुणाला ना कुणाला लाच घेताना जाळ्यात पकडले जात आहे. एसीबीचे हे जाळे आता तलाठी, ग्रामसेवक, शिपाई यांच्यापुरते मर्यादित राहिलेले नसून राजपत्रित, अखिल भारतीय सेवेतील अधिकारीही या जाळ्यात अडकू लागले आहेत. त्यामुळे एसीबीच्या ट्रॅपची शासकीय यंत्रणेत प्रचंड दहशत आहे. अलीकडे ट्रॅपची संख्या वाढल्याने महसूल यंत्रणेने तर चिरीमिरीची कामे तूर्त बाजूलाच ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ही यंत्रणा ती वादग्रस्त कामेही निकाली काढत नाही आणि पैसेही मागत नसल्याचे सांगण्यात येते. उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी ट्रॅपमध्ये अडकू शकतो तर तलाठी-लिपिकांचे काय, याचा विचार करून ही यंत्रणा सावध झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सतीश देशमुख यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यात मोहीम राबविली जात आहे. आतापर्यंत आठ ते नऊ महिन्यात २४ पेक्षा अधिक ट्रॅप यशस्वी झाले. त्यात बहुतांश महसूल व पोलीस कर्मचारीच जाळ्यात अडकले. त्यात उपजिल्हाधिकाऱ्याचाही समावेश आहे. यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात आतापर्यंत दोन ते तीन ट्रॅप पाठोपाठ यशस्वी झाले आहे. आणखी तीन-चार कर्मचाऱ्यांबाबत नागरिकांची ओरड ऐकायला मिळते. भविष्यात तेही जाळ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. यवतमाळ एसीबीचे ट्रॅप आतापर्यंत एका वर्षात १५ पर्यंत पोहोचले होते. परंतु यावेळी पहिल्यांदाच ही संख्या नऊ महिन्यात २४ वर गेली आहे. आणखी तीन महिने वर्ष संपायला बाकी आहे. त्यामुळे हा आकडा तीन डझनावर जाण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यातच एसीबीची कामगिरी उंचावली आहे. यापूर्वी वर्षभरात जेवढे ट्रॅप राज्यभरात यशस्वी होत होते यावेळी तो आकडा अवघ्या सहा महिन्यातच गाठला गेला आहे. यावरून एसीबीमध्ये ट्रॅपला यापूर्वीही किती वाव होता हे दिसून येते. यापूर्वी केवळ लाच स्वीकारली तरच गुन्हा दाखल केला जात होता. परंतु प्रवीण दीक्षितांच्या मोहिमेत लाच मागितल्याचे सिद्ध झाले तरी थेट गुन्हा नोंदविला जात असल्याने ट्रॅपची संख्या दुपटीने वाढली आहे. यापूर्वी लाच मागितल्याचे सिद्ध होवूनही गुन्हे नोंदविले गेले नाही. अर्थात हे गुन्हे दडपले गेले. पर्यायाने एसीबीचे अप्रत्यक्ष लाचखोरांना पाठबळच लाभले होते. ही परंपरा आता मोडीत निघाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
‘एसीबी’चे ट्रॅप पोहोचले दोन डझनावर
By admin | Updated: September 14, 2014 00:12 IST
एरवी संपूर्ण वर्षभरात अवघे १२ ते १५ ट्रॅप यशस्वी करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची (एसीबी) कामगिरी यावर्षी चांगलीच उंचावली आहे. अवघ्या आठ-नऊ महिन्यातच एसीबीच्या ट्रॅपची संख्या
‘एसीबी’चे ट्रॅप पोहोचले दोन डझनावर
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}