आर्णी मार्गावर २६ झाडे उन्मळली

By Admin | Updated: March 12, 2015 02:15 IST2015-03-12T02:15:14+5:302015-03-12T02:15:14+5:30

प्रचंड वादळाने यवतमाळ-आर्णी मार्गावरील जवळा ते तरोडा दरम्यान २६ झाडे उन्मळून पडली असून लोणबेहळ सर्कलला गारपिटीचा तडाखा बसला.

26 trees removed from Arni Marg | आर्णी मार्गावर २६ झाडे उन्मळली

आर्णी मार्गावर २६ झाडे उन्मळली

आर्णी : प्रचंड वादळाने यवतमाळ-आर्णी मार्गावरील जवळा ते तरोडा दरम्यान २६ झाडे उन्मळून पडली असून लोणबेहळ सर्कलला गारपिटीचा तडाखा बसला. बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तालुक्यात प्रचंड वादळाने गारपीट झाली.
सायंकाळी मेघगर्जनेसह प्रचंड वादळाला प्रारंभ झाला. वादळाचा वेग एवढा प्रचंड होता की, नागपूर-बोरी-तुळजापूर राज्य मार्गावरील २६ मोठ्ठाली झाडे उन्मळून पडली. यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. वीज पुरवठाही खंडित झाला आहे. अर्धातास चाललेल्या या वादळाने मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. तर तालुक्यातील लोणबेहळ परिसरात राणीधानोरा, कवठा बाजार, अंजनखेड, शेंदूरसुनी, अंबोडा, साकूर या गावांना गारांचा तडाखा बसला. साधारणत: १५ ते २० मिनिट लिंबाच्या आकाराच्या गारा कोसळल्या. सायंकाळच्या वेळी झालेल्या या तांडवाने नेमके किती नुकसान झाले हे मात्र कळू शकले नाही. मात्र अनेक ठिकाणी वृक्ष वीज तारांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. वादळाचा तडाखा गहू, हरभरा, आंबा या पिकांना बसला आहे. अनेक घरांवरील टीनपत्रेही उडाल्याची माहिती आहे. दरम्यान आर्णी मार्गावर तुटलेली झाडे बाजूला करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले. मात्र वृत्तलिहेस्तोवर या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. निसर्गाच्या या प्रकोपाने शेतकरी पुरता हादरला असून रबी हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 26 trees removed from Arni Marg