Zilla Parishad Election: Congress, NCP do not match with Shiv Sena! | जिल्हा परिषद निवडणूक : काँग्रेस, राष्ट्रवादीचे शिवसेनेसोबत सूत जुळेना!
जिल्हा परिषद निवडणूक : काँग्रेस, राष्ट्रवादीचे शिवसेनेसोबत सूत जुळेना!

- सुनील काकडे  
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक अवघ्या २७ दिवसांवर येऊन ठेपली असताना ही निवडणूक सोबत लढायची किंवा स्वतंत्र, याबाबत महाविकास आघाडीने कुठलेच ठोस धोरण अद्याप जाहीर केलेले नाही. दुसरीकडे स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे शिवसेनेसोबत मनोमिलन झाले नसून, एकत्र निवडणूक लढण्यासंबंधी दबक्या आवाजात नाराजीचा सूर उमटत आहे.
हिंदुत्वाच्या मुद्यावर सुरूवातीपासूनच हातात हात घेऊन महाराष्ट्रातील प्रत्येक निवडणूकीस सामोरे गेलेल्या भाजपा आणि शिवसेनेचे चालूवर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर मात्र मुख्यमंत्री पदावरून बिनसले आणि युती संपुष्टात आली. शिवसेनेने भाजपासोबत असलेले राजकीय संबंध तोडत महाराष्ट्र विकास आघाडीच्या नावाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसला सोबत घेऊन राज्यात सत्ता स्थापन केली. दरम्यान, सत्तेसाठी झालेल्या या राजकीय उलथापालथीचे परिणाम जिल्ह्यातील राजकारणावरही झाले असून तोंडावर असलेली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक महाविकास आघाडी सोबत लढणार का, यावर चर्चा सुरू झाली आहे. असे असले तरी निवडणूक अवघ्या २७ दिवसांवर येऊन ठेपली असतानाही यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून कुठलेही ठोस धोरण जाहीर झाले नसल्याने तीन्ही पक्षांमधील स्थानिक पातळीवरील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुरते संभ्रमात सापडले आहेत.
गतवेळच्या वाशिम जिल्हा परिषद निवडणूकीत काँग्रेसने ५२ पैकी १७ जागांवर विजय मिळविला होता; तर मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने ८ जागांवर विजय मिळविला होता. ठरल्यानुसार काँग्रेसने सलग पाच वर्षे अध्यक्षपद; तर राष्ट्रवादीने उपाध्यक्षपद उपभोगले. अवघ्या काही दिवसानंतर पुन्हा होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणूकीसाठी या दोन्ही पक्षांनी रणनिती आखली आहे; मात्र बदललेल्या राजकीय समिकरणांमुळे महाविकास आघाडीच्या नावाखाली एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्यास शिवसेनेला सोबत घेऊन निवडणूकीस सामोरे जावे लागणार आहे. एवढेच नव्हे; तर काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्राबल्य असणाऱ्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये सेनेने दावा ठोकल्यास मित्रत्वाखातर काही सर्कलही सेनेसाठी सोडावे लागतील. परिणामी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून हाच मुद्दा काँग्रेस, राष्ट्रवादीतील स्थानिकच्या काही नेतेमंडळींना चांगलाच खटकत असून महाविकास आघाडीने सोबत निवडणूक लढण्याबाबत सद्यातरी दबक्या आवाजात नाराजीचा सूर उमटत आहे.


पक्षश्रेष्ठीकडून सद्यातरी एकत्रीत निवडणूक लढण्याचा निरोप मिळालेला नाही; मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सोबत घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्यास जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळी, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन काँग्रेस निवडणूकीला सामोरे जाईल.
- दिलीप सरनाईक
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस


आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीला स्वबळावर सामोरे जाण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली आहे. त्यानुषंगाने नियोजन केले जात आहे. अशात काँग्रेस आणि शिवसेनेसोबत एकत्रीत निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्यास तडजोड करून राष्ट्रवादी काँग्रेसची त्यासाठी देखील तयारी असेन.
- चंद्रकांत ठाकरे
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस


महाविकास आघाडीच्या नावाखाली राज्यात सत्तास्थापन होऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे आगामी जि.प., पं.स. निवडणूकाही सोबत लढाव्यात, असे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. असा काही निर्णय झाल्यास जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा निश्चितपणे विरोध नसणार.
- सुरेश मापारी
जिल्हाप्रमुख, शिवसेना

 

Web Title: Zilla Parishad Election: Congress, NCP do not match with Shiv Sena!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.