Washim: शाळांना सुटी लागली, मुलांनी जावे कुठे? शहरात एकही उद्यान नाही, बच्चे कंपनीचा हिरमोड

By संतोष वानखडे | Published: May 7, 2024 01:37 PM2024-05-07T13:37:12+5:302024-05-07T13:37:53+5:30

Washim News: मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच शाळांना सुटी लागल्याने साहजिकच मुलांना स्वच्छंदीपणे बाहेर खेळावेसे वाटते. परंतू, खेळण्या-बागडण्यासाठी विरंगूळा म्हणून शहरात एकही उद्यान नसल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे.

Washim: Schools are out, where should children go? There is not a single park in the city, the Hirmod of Bachche company | Washim: शाळांना सुटी लागली, मुलांनी जावे कुठे? शहरात एकही उद्यान नाही, बच्चे कंपनीचा हिरमोड

Washim: शाळांना सुटी लागली, मुलांनी जावे कुठे? शहरात एकही उद्यान नाही, बच्चे कंपनीचा हिरमोड

- संतोष वानखडे
वाशिम - मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच शाळांना सुटी लागल्याने साहजिकच मुलांना स्वच्छंदीपणे बाहेर खेळावेसे वाटते. परंतू, खेळण्या-बागडण्यासाठी विरंगूळा म्हणून शहरात एकही उद्यान नसल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे. शहरात एकही उद्यान नसल्याने आम्ही जावे तरी कुठे? असा सूर बच्चे कंपनीमधून उमटत आहे.

परीक्षा संपल्याने अभ्यासाच्या व्यापातून किमान दोन महिने मुले मुक्त झाली आहेत. वाशिम शहरात विरंगुळा म्हणून एकही अद्ययावत उद्यान नाही. शहराच्या सौंदर्यीकरणात उद्यानांची भूमिका महत्त्वाची असते. विरंगूळा म्हणून बच्चे कंपनीपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच स्तरातील नागरिक सकाळ व सायंकाळच्या फावल्या वेळेत उद्यानात फिरण्याला पसंती देतात. सन १९८५ साली तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या हस्ते वाशिम शहरात पाटणी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान असलेल्या मुख्य रस्त्यालगत टिळक उद्यानाचे उद्घाटन झाले होते. विविध वृक्ष, बच्चे कंपनीला खेळण्यासाठी विविध साधने, भरपूर पाणी, फुलझाडांनी सुसज्ज असे हे उद्यान नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होते. मात्र, त्यानंतर नियमित देखभाल झाली नाही. सद्यस्थितीत टिळक उद्यान भकास अवस्थेत आहे. शहरात अद्ययावत उद्यान असावे म्हणून स्थानिक अकोला नाकास्थित नगर परिषद कार्यालयासमोर टेम्पल गार्डन तसेच नाट्यगृहाचे बांधकाम साधारणत: सात-आठ वर्षापूर्वी हाती घेण्यात आले. दीर्घ कालावधीनंतरही काम पुर्णत्वाकडे आले नाही. त्यामुळे एकिकडे टिळक उद्यान भकास अवस्थेत आहे तर नवीन टेम्पल गार्डनही सुरू झाले नाही. परिणामी, उन्हाळी सुटीत बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे.

Web Title: Washim: Schools are out, where should children go? There is not a single park in the city, the Hirmod of Bachche company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम